कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांची बुधवारी भेट घेतल्याने मतदार संघात विविध तर्क वितर्कांना उधाण आले. ते लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा रंगली परंतू त्यांनी ती स्पष्ट शब्दात खोडून काढली.
जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या निवासस्थानी माजी आमदार पाटील यांनी ही सुमारे वीस मिनिटे भेट घेतली. राजकीय प्रवास व कारखान्याचा कारभार कसा सुरु आहे याबध्दल माहिती दिली. राधानगरी मतदार संघातून राष्ट्रवादीकडून ते विधानसभेचे प्रबळ दावेदार आहेत. त्यासाठी त्यांना शिवसेनेची मदत महत्वाची आहे. दुसरे अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे महाविकास आघाडी अंतर्गत तिन्ही पक्षांनी आता ज्या जागा जिंकल्या होत्या. त्या जागा त्याच पक्षाला राहतील. तसे झाल्यास राधानगरीची जागा शिवसेनेच्या वाट्याला राहू शकते. अशा स्थितीत के.पी. यांना शिवसेनेची मशाल हातात घ्यावी लागेल.
साठीचीही मोर्चबांधणी म्हणून या भेटीकडे पाहिले जाते. राजकारणात कोणत्यावेळी काय होईल हे सांगता येत नाही. शिवसेनेत बंडखोरी केलेल्यांच्याविरोधात शिवसेनेचाच उमेदवार द्यायचा अशी रणनीती निश्चित झाल्यास या घडामोडींना महत्व येवू शकते. म्हणूनच सकाळी सकाळी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येते.
खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, ते पहिल्यादांच कोल्हापुरात आल्याने त्यांची भेट घेऊन स्वागत केले. लोकसभेच्या निवडणुका अद्याप लांब आहेत, आपण इच्छुक नसून तशी चर्चाही तिथे झाली नाही.
- के. पी. पाटील, माजी आमदारनरके-राजू लाटकर यांच्या घरी भेट
खासदार राऊत आज गुरुवारी सकाळी चेतन नरके यांच्या घरी भेट देणार आहेत. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजू लाटकर यांच्या घरी राऊत यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांची बैठक आहे.