कोल्हापूर-
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा झाली. शिवसेनेचे नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळेही कोल्हापुरच्या सभेकडे आज सर्वांचं लक्ष लागून होतं. संजय राऊतांनी आजच्या सभेत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या भाषणावेळी शिवसैनिक 'चंपा चंपा' अशी घोषणाबाजी करत होते. त्यावरही संजय राऊतांनी नाव न घेता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. "चंपाबाई आता कोल्हापुरात येत नाही असं कळलं", असं विधान संजय राऊत यांनी केलं. त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीनं सभा गाजवली.
संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. संजय राऊत यांनी सभेला संबोधित करताना राज्यसभेच्या उमदेवारीवरुन संभाजीराजे छत्रपतींनी केलेले आरोप आणि त्यांचे वडील शाहू छत्रपतींनी केलेल्या विधानावरुन भाजपावर निशाणा साधला. "उद्धव ठाकरे कसे आहेत, तर वेळ आली की एका सामान्य शिवसैनिकाला अलगद उचलून राज्यसभेत ठेवला. जागा कोणतीही असेल मग ती आता गाजत अशलेली सहावी जागा असेल. मी कोल्हापूरचे शाहू छत्रपतींचे आभार मानतो. त्यांनी संभ्रम दूर केला. शाहू महाराज यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांचा मुखवटा उतरवला आहे. कोल्हापुरात आजही सत्य आणि प्रामाणिकपणा आहे हे शाहू छत्रपतींनी पुन्ही दाखवून दिलं आहे. शिवसेनेनं कधीही छत्रपती घराण्याचा अपमान केलेला नाही. नेहमी मानच राखला आहे. शाहू छत्रपतींचे वक्तव्य म्हणजे अंबाबाईचा प्रसाद आहे. भाजपावाल्यांनो आता तरी शांत व्हा आणि गप्पा बसा", असं संजय राऊत म्हणाले.
कोल्हापूरचा महापौर शिवसेनेशिवाय होणार नाही"कोल्हापुरात सहा आमदार होते, आता पाच का आले? ते आघाडी बिघाडी नंतर बघू काय करायचं ते. आता तीन खासदार आहेत. पुढे सहा आमदार आले पाहिजेत. त्याआधी कोल्हापूर महापालिका निवडणूक तसेच तुमची चंपाबाई आता कोल्हापुरात येत नाही असं मला कळलं. आता कोल्हापुरचा महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही", असं संजय राऊत म्हणाले.