कोल्हापूर : वडगाव (ता. हातकणंगले) येथील जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार मृत्यूप्रकरणी फरार असलेला वडगाव पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक संजीव रामचंद्र पाटील (वय ४५, रा. पुणे, मूळ गाव सोलापूर) यास काल, शुक्रवारी रात्री राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीआयडी) पोलिसांनी अटक केली. बसवर दगडफेक केल्याच्या कारणावरून वडगाव पोलिसांनी सनी पोवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने नातेवाईक व दलित संघटना आक्रमक होऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला. तसेच संबंधित पोलीस अधिकारी संजीव पाटील, बबन शिंदे व धनाजी पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तत्काळ पाटील यांच्यासह दोघा पोलिसांना निलंबित केले. त्यानंतर मृत सनीचा भाऊ जयदीप पोवार याने फिर्याद दिल्याने तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (कलम ३०२) दाखल झाला. त्या वेळेपासून ते पसार होते. ‘सीआयडी’च्या पोलिसांनी यापूर्वी बबन शिंदे याला अटक केली, तर संशयित आरोपी सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील व धनाजी पाटील हे पसार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला असता न्यायालयाने तो नामंजूर केला. सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर संजीव पाटील हा स्वत:हून ‘सीआयडी’च्या कार्यालयात हजर झाला; तर धनाजी पाटील हा फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. सीआयडीच्या पोलीस अधीक्षक दीपाली काळे व पोलीस निरीक्षक मा. शा. पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
संजीव पाटील यास अटक
By admin | Published: September 28, 2014 12:49 AM