कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरात सुरू असलेले ‘संजीवनी अभियान’ कोरोनाबाधित रुग्ण शोधण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी ठरत आहे. कोरोना झाला असल्याची ज्यांना साधी कल्पनाही नाही, अशा व्यक्ती या अभियानाद्वारे होत असलेल्या सर्वेक्षणातून पुढे येत आहेत.
पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत संजीवनी अभियान सुरू असून, याअंतर्गत गुरुवारी ६२०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात व्याधीग्रस्त ७५५ नागरिकांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली तेव्हा ३६ नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, तर ७१९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. या नागरिकांना कोरोना झाल्याची साधी कल्पनाही नव्हती. त्यांच्यापासून कुटुंबातील सदस्यांना तसेच शेजाऱ्यांना होणारा संसर्ग टाळता आला, हेच या अभियानाचे यश आहे.
या सर्वेक्षणात ५४९८ व्याधीग्रस्त नागरिकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोविडसदृश लक्षणे असणारे ८३ नागरिक आढळून आले; तर १०३१ व्याधीग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
महापालिकेच्या १५८ वैद्यकीय पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये मंगेशकरनगर, काळकाई मंदिर, देवकर पाणंद, टिंबर मार्केट, ब्रम्हेश्वर बाग, शाहूपुरी, दौलतनगर, राजारामपुरी, शुक्रवार पेठ, दुधाळी, जुना बुधवार, बाजार गेट, कसबा बावडा, लाईन बझार, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, साईस एक्स्टेशन, टाकाळा, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, रुईकर कॉलनी, भारतनगर, राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत, राजोपाध्येनगर, नाना पाटीलनगर, अंबाई टँक, विचारेमाळ, भोसलेवाडी, रमनमळा, गंजी गल्ली, सिध्दार्थनगर, दादू चौगुलेनगर, लक्ष्मीपुरी मार्केट, आयसोलेशन येथे हे अभियान राबविण्यात आले.