सदाशिव मोरे
आजरा : संकेश्वर- आंबोली हा ६१ कि.मी. लांबीचा आंतरराज्य महामार्ग गडहिंग्लज व आजरा शहरातून जाणार आहे. १२ मीटर रुंदीचा हा रस्ता दोन पदरी असणार आहे. आजऱ्याजवळील १३२ वर्षांपूर्वीच्या हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाला ९० मीटर लांबीचा पर्यायी पूल होणार आहे.
संकेश्वर ते आंबोली हा रस्ता दोनपदरी होणार असून, १२ मीटर रुंदीने होणार आहे. मुख्य रस्ता ७ मीटरचा असून, दोन्ही बाजूला काँक्रीटच्या साइडपट्ट्या प्रत्येकी दीड मीटरच्या असणार आहेत. नागरिकांना ये- जा करण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी १ मीटरचा पदपथ असणार आहे.
या ६१ किलोमीटरच्या अंतरावरील रस्त्यासाठी १२ मीटरप्रमाणे रुंदीकरण केले जाणार असून, अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
संकेश्वर- आंबोली हा आंतरराज्य मार्ग आजरा व गडहिंग्लज शहरातून जाणार असून, गावातील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने काढली जाणार आहेत. या रस्त्याची प्रत्यक्ष सुरुवात नोव्हेंबर ते डिसेंबर २०२१ मध्ये होणार आहे. टेंडर प्रक्रिया दिल्ली येथील नॅशनल हायवे ॲथॉरिटीच्या कार्यालयातून होणार आहे. आजऱ्याजवळील हिरण्यकेशी नदीवरील १३२ वर्षांच्या व्हिक्टोरिया पुलाला पर्यायी पूल होणार असून, ९० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा हा पूल होणार आहे. या पुलासाठी अंदाजे ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
व्हिक्टोरिया पूल १८८७ मध्ये बांधण्यास सुरुवात केली व १८८९ मध्ये बांधकाम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला करण्यात आला. पाच गाळ्यांचा असलेला हा पूल ९३.५० मीटर लांबीचा आहे. त्यावेळी या पुलाला ९६,३७२ रुपये इतका खर्च आला होता. पुलाची वाहतुकीची क्षमता १६ ते १८ टन असतानाही सध्या या पुलावरून २० ते ३० टन वजनाची अवजड वाहतूक सुरू आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये व्हिक्टोरिया पूल अजूनही सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. दगड व चुन्याने बांधलेला व आकर्षक असा व्हिक्टोरिया पूल आहे.
--------------------------
आंतरराज्य मार्ग संकेश्वर- गडहिंग्लज- आजरा- गवसे-
आंबोली, असा ६१ किलोमीटरचा मार्ग आजरा व गडहिंग्लज शहरातून जाणार.
धोकादायक वळणे व पूल काढणार.
१२ मीटरप्रमाणे अतिक्रमण काढणार.
रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला डिसेंबर २०२१ मध्ये होणार सुरुवात.
आंबोली ते बांदा या रस्त्यासाठी पुढील वर्षी निधी मिळणार.
व्हिक्टोरिया पुलाला पर्यायी पूल होणार.
फोटो ओळी :
संकेश्वर- गडहिंग्लज- आजरा- आंबोली- गवसेकडे जाणारा ६१. कि.मी.चा आंतरराज्य मार्ग.
क्रमांक : ०९०४२०२१-गड-०४