कोल्हापूर : अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे यंदा ग्राहकांना मिरचीच्या दरवाढीचा ठसका लागला आहे. चटणी बनविण्याच्या कालावधीतच बॅडगी, लवंगी, कश्मिरी या सगळ्या प्रकारच्या मिरच्यांना मागे टाकत संकेश्वरी मिरचीने किलोला पंधराशे रुपयांचा दर गाठला आहे. ही मिरची गतवर्षी सहाशे रुपयांपर्यंत मिळत होती. याशिवाय अन्य मिरचीच्या दरातही शंभर ते १३० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, चटणी बनविण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात घरोघरी चटणी बनविण्याची लगबग असते. अतिवृष्टीमुळे मिरची कुजल्याने बाजारपेठेत आवक कमी झाली आहे, त्यामुळे दरात किमान शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. अगदी साध्या लवंगी मिरचीपासून ते संकेश्वरीपर्यंतच्या विविध मिरच्यांनी किलोमागे २३० ते १५०० रुपयांपर्यंतची मजल मारली आहे. अन्य मिरचीच्या तुलनेत चव वेगळी असल्याने संकेश्वरी मिरचीला सर्वाधिक मागणी आहे. ही मिरची हैदराबादमधून, तर बॅडगी मिरची कर्नाटकातून येते.>कोल्हापुरात कर्नाटक आणि आंध्र, हैदराबादमधून मिरची येते. यंदा पाऊस आणि पुरामुळे मिरचीची आवक कमी झाली आहे. परिणामी दर खूप वाढले आहेत; पण मिरची गरजेचीच असल्याने सर्वसामान्य ग्राहक जरा कमी दर असलेल्या साध्या मिरचीची मागणी करत आहे.- सूरज हळदे ,मिरची व्यावसायिक, कोल्हापूरवर्षभराची चटणी बनविण्यासाठी ५ किलो मिरची खरेदी करते. यावर्षी दर डबल झाले आहेत; पण मिरची खरेदीला पर्याय नसतो. वर्षभर वापरायची असते. त्यामुळे हलक्या प्रतीच्या मिरचीचीही खरेदी करता येत नाही.- हेमा जाधव, गृहिणी, कोल्हापूर
संकेश्वरी मिरचीच्या दरवाढीने लागला ठसका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 4:31 AM