लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत आर्थिक मंदी आली होती. बॅँकिंग क्षेत्रही त्याला अपवाद उरले नाही. तरीही सन्मती बॅँकेचे व्यवस्थापन, सभासद व ठेवीदारांचा विश्वास, नियोजनबद्ध नियोजनामुळे सन्मती सहकारी बॅँकेला गत आर्थिक वर्षात तीन कोटी १३ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला, अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.
बहुराज्यीय असलेल्या सन्मती सहकारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.ते म्हणाले, कोरोना व महापुरामुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय, शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला. आर्थिक उत्पन्नात घट झाली. तरीदेखील बॅँकेच्या संचालक मंडळाने अभ्यासपूर्ण व धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करत अहवाल सालात बॅँकेचा व्यवसाय २७.३१ कोटींनी वाढला. ठेवींमध्ये ३० कोटींनी वाढ झाली. ढोबळ नफा तीन कोटी १३ लाख इतका झाला आहे. बॅँकेकडून समाजातील शेवटचा घटक स्वत:च्या पायावर कसा उभा राहील, यासाठी धोरण अवलंबले आहेत. भविष्यातही अशा घटकांना बळ देण्याचे काम निश्चित केले जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. त्याला सभासदांनी मंजुरी दिली. सभेसाठी अजित कोईक, धुळासाहेब चौगुले, शीतल पाटील, डॉ. प्रद्युम्नकुमार कडोले, आदाप्पा कुरूंदवाडे, डॉ. पुरुषोत्तम कुलकर्णी, विठ्ठल चोपडे, समीर मैंदर्गी, महेश कुंभार आदींसह सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले. उपाध्यक्ष एम. के. कांबळे यांनी आभार मानले.
फोटो ओळी
२६०९२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत सन्मती सहकारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले.