कोल्हापूर, दि. २९ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ)च्या तिसंगी (ता. गगनबावडा) येथील बल्क कुलर सेंटरवर दूध वाहतूक करणाºया टेम्पोत ओढ्यातील पाणी मिसळण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला. संस्थाचालकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असला तरी दूध संघाने अद्याप संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई न केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
‘गोकुळ’ने सात-आठ गावांतील दूध बल्क कुलरच्या माध्यमातून संकलन करण्यास सुरुवात केली आहे. तिसंगी येथील बल्क कुलर सेंटरवर परिसरातील १९ संस्थांचे दूध संकलित केले जाते. या संस्थांकडून टेम्पोतून दूध सेंटरवर आणले जाते.
संस्थांचे दूध दुय्यम प्रतीचे येऊ लागल्याने काही संस्थाचालकांचा टेम्पोचालकावर संशय होता. त्यांना महिनाभर पाळत ठेवल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सात वाजता दुधाचे कॅन घेऊन टेम्पो तिसंगी येथील बल्क कुलर सेंटरकडे रवाना झाला; पण मांडुकली येथील ओढ्यावर टेम्पो थांबवून दुधात पाणी मिसळण्याचे काम चालक चंद्रकांत गुरव करीत असल्याचे संस्थाचालक शांताराम पाटील यांच्या निदर्शनास आले.
गुरव यांना रंगेहात पकडून गावातील संस्थाचालकांसमोर उभे केले. हा प्रकार ‘गोकुळ’चे सुपरवायझर आनंदा चौगले यांना कळविले. त्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले; पण ठेकेदाराने टेम्पोचालक गुरव यांना बदलले. एवढीच कारवाई गेल्या तीन दिवसांत झाली आहे.संस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्षच!या भागातील दूध संस्थांच्या दुधात घट येणे, वासाचे दूध निघणे, फॅट कमी लागल्याने दुय्यम प्रतीच्या दुधाचे प्रमाण वाढले होते. याबाबत गेले दोन-तीन महिने संस्थाचालक ‘गोकुळ’कडे तक्रार करीत होते; पण दुर्लक्ष केल्याचा आरोप संस्थाचालक करीत आहेत.संस्थांच्या नुकसानीस जबाबदार कोण?दूध भेसळीत संघाचे नुकसान झाले असेल तर तेवढी वसुली संबंधित ठेकेदाराच्या वाहतुकीच्या बिलातून केली जाणार आहे; पण संस्थांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवालही संस्थेचे प्रतिनिधी करीत आहेत.भेसळीचे साहित्य जप्तविहीर व ओढ्याचे पाणी मिसळण्यासाठी लागणाºया बादल्या, कॅन, प्लास्टिकची बरणी, आदी साहित्य संस्थाचालकांनी टेम्पोतून जप्त केले. साहित्याचा वापर पाहता, गेल्या अनेक महिन्यांपासून भेसळीचे काम होत असून, यामध्ये इतर यंत्रणाही सक्रिय असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तिसंगी बल्क कुलरकडे दूध घेऊन येणारा टेम्पो भेसळ करताना सापडला आहे; पण आपल्यापर्यंत कोणताही अहवाल आलेला नाही. संबंधित ठेकेदाराने टेम्पोचालकाला काढून टाकले आहे. दूध संघाचे नुकसान झाले असेल तर ते ठेकेदाराच्या बिलातून कपात करणार आहे. ठेका रद्द करण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे.- डी. व्ही. घाणेकर (कार्यकारी संचालक, ‘गोकुळ’)