कोल्हापूर : येथील ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ या कंपनीचे तीन किलो सोने, अडीच कोटी रोकड व एक महागडी कार, असा तीन कोटी रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटून फरार असलेल्या संशयित संतोष ऊर्फ भावड्या ज्ञानोबा मोरे (वय २८, रा. यमाईनगर दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) याला ठाणे येथून राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडून ३० लाख किमतीचे एक किलो सोन्याचे बिस्कीट जप्त केले. त्याचा साथीदार सोमनाथ यल्लाप्पा माने (रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.मुंबईहून आलेल्या एक कोटी १८ लाख रुपयांच्या हवालाच्या मुद्देमालाची लूटमार १४ जूनला झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित लक्ष्मण अंकुश पवार (रा. खटके वस्ती, लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (रा. तमदलगे, ता. हातकणंगले), अविनाश बजरंग मोटे (रा. शिवाजी चौक, हातकणंगले), अक्षय लक्ष्मण मोहिते (रा. आंबेडकरनगर, हातकणंगले), इंद्रजित बापू देसाई (रा. हातकणंगले), संशयित चालक झुंबऱ्या ऊर्फ राजू बळीराम कदम यांना अटक केली होती. लक्ष्मी गोल्ड बुलियन व्यवसायाचा मालक विकास कदम यांच्या गाडीवर चालक असलेल्या झुंबºया कदम यानेच कट रचल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्याकडून आतापर्यंत तीन कोटी सात लाख रुपये जप्त केले आहेत.
अजून ५० लाखांची रोकड व दोन किलो सोन्याची बिस्कीटे हस्तगत करायची होती. फरार संतोष मोरे हा गुन्हा घडल्यानंतर कुटुंबासह गाव सोडून गेला होता. तो पूर्वी घाटकोपर व ठाणे परिसरात कामाला होता. त्यानुसार या परिसरात त्याची माहिती घेतली असता, तो ठाणे जिल्ह्यामध्ये काळकुम गावी घर भाड्याने घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली.
सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून ३० लाख किमतीचे एक किलो सोन्याचे बिस्कीट जप्त केले. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. साथीदार सोमनाथ माने याचा मोबाईल बंद असल्याने लोकेशन मिळून येत नाही. त्यांच्या पै-पाहूण्यांकडेही पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या रकमेची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे.