गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुन यांच्या आत्महत्याप्रकरणी संशयित आरोपी ‘त्या’ माजी नगरसेविकेसह ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याला कर्नाटकातील विजापूर येथून ताब्यात घेतले आहे. संशयित अन्य दोघांच्या शोधासाठी पुणे परिसरात पथके असून, त्यांनाही ताब्यात घेण्यात लवकरच यश येईल, असे पोलिस सूत्रांनी रविवारी (२५) सांगितले.शुक्रवारी (२३) रात्री राहत्या घरातील बेडरूममध्ये उद्योजक शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांनी विष प्राशन व गळे चिरून घेऊन, आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी संतोष आणि तेजस्विनी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि वहीतील मजकूर व फिर्यादीवरून ‘त्या’ नगरसेविकेसह संशयित पोलिस अधिकारी राहुल राऊत यांच्यासह विशाल बाणेकर व संतोष पाटे (रा.पुणे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालावरून पत्नी व मुलगा यांचा विष पाजून, गळा चिरून खून आणि त्यानंतर स्वत: विष प्राशन व गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी मृत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक गजानन सरगर अधिक तपास करीत आहेत.आरोपींचे वकीलपत्र घेऊ नयेदरम्यान, बलात्काराचा खोटा गुन्हा आणि खंडणीची मागणी करून शिंदे, त्यांची पत्नी व मुलास आत्महत्येला प्रवृत्त करून, माणुसकीला काळिमा फासलेल्या आरोपींचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असे आवाहन येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे गडहिंग्लज ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश तेली यांना केले आहे.
तीन पोलिस पथके रवानासंतोष शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. त्यासाठी कर्नाटकसह पुणे व सांगली परिसरात मिळून ३ पथके रवाना झाली आहेत. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात लवकरच यश येईल, असे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालावरून पत्नी व मुलगा यांचा विष पाजून, गळा चिरून खून आणि त्यानंतर स्वत: विषप्राशन व गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी मृत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.