कोल्हापूर : वेळ पहाटे सहाची... रविवार सुटीचा दिवस असल्याने अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक दर्शनरांगेत उभे होते. दर्शनाच्या ओढीने महिला पुढे सरकत असतानाच अचानक विषारी साप (मण्यार) त्यांच्या पायात आला. भीतीने साप...साप... अशी आरडाओरडा करीत महिला सैरावैरा पळू लागल्या. या प्रकाराने देवस्थान समिती प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण केले. यावेळी जवान संग्राम शंकर मोरे (वय ३०, रा. देवकर पाणंद) हे सापाला पकडण्यासाठी गेले असता त्यांच्या उजव्या हाताला सापाने दंश केला, तरीही जिवाची पर्वा न करता त्यांनी धाडसाने त्याला पकडले. अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची गर्दी होत आहे. मंदिराच्या सभोवती बंदूकधारी पोलीस, खासगी सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे हे येथील परिसरावर बारकाईने नजर ठेवून आहेत. सीसीटीव्ही कंट्रोलरूममध्ये २४ तास देवस्थान समितीचे कर्मचारी बसून आहेत. अशावेळी आज पहाटे सहाच्या सुमारास मंदिरातील पूर्व दरवाजाच्या महिलांच्या दर्शन रांगेत अचानक साप आला. साप दिसताच महिला आरडाओरडा करीत सैरावैरा पळत सुटल्या. साप कुठे जातो, हे काही भाविक पाहत होते. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत भाविकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे जवान संग्राम मोरे हे धाडसाने पुढे होऊन साप पकडण्यासाठी गेले. त्यांनी सापाची शेपटी पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला त्याने दंश केला. साप हा अतिविषारी असल्याचे त्यांच्या लक्षात येऊनही त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता सापाला पकडले. हा चित्तथरारक प्रसंग सुमारे तासभर भाविक श्वास रोखून पाहत होते. सापाला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. जखमी मोरे यांना व्हाईट आर्मीचे जवान अक्षय चौगले, ओंकार कारंडे, श्रीकांत पाटील यांनी तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्या सापाला शिवाजी विद्यापीठाच्या माळावर सुरक्षितस्थळी सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
दर्शनरांगेत घुसला साप
By admin | Published: September 29, 2014 1:02 AM