कोल्हापूर : कुष्ठपीडितांचाही समाजात साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये सहभाग असावा,या हेतूने कोल्हापूर प्रेस क्लब व साक्षी महिला विकास संस्थेतर्फे शेंडा पार्कातील स्वाधारनगरमध्ये शुक्रवारी सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कुष्ठपीडितांसमवेत रंगपंचमीचा आनंद लुटला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला.कुष्ठपीडित म्हटले की, अनेकांच्या भुवया उंचावतात व त्यांची सावलीही नको अशी कांहीची भावना असते. मात्र, शुक्रवारी या सर्व गैरसमजांना फाटा देत कोल्हापूर प्रेस क्लब व साक्षी महिला विकास संस्थेच्यावतीने स्वाधारनगर येथे कुष्ठपीडितांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी रंगपंचमी साजरी केली. सप्तरंगाच्या मुक्त उधळणीत या नगरीतील आबालवृद्ध सहभागी झाले. यानिमित्त उपस्थितांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. विजय देवणे म्हणाले,‘या वसाहतीतील लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यास कोल्हापूरातील सर्वच माध्यमांचेही चांगले पाठबळ मिळाले आहे. ’प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी कुष्ठपीडितांसमवेतच्या अशा कार्यक्रमामुळे या रोगाबद्दलचे गैरसमजही कमी होण्यास मदत होईल असे सांगितले. यावेळी जनस्वास्थ समितीचे दीपक देवलापूरकर, हिलरायडर्सचे प्रमोद पाटील, साक्षी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा माया रणवरे, सार्थक क्रि एशन्सचे सागर बगाडे, प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रताप नाईक, श्रद्धा जोगळेकर, प्रविण देसाई, एकनाथ पाटील, सचिन भोसले, गणेश शिंदे, संजय देसाई, संभाजी थोरात, सचिन सावंत, मिथुन राजाध्यक्ष, आदी मान्यवर उपस्थित होते.
सप्तरंगात न्हाली कुष्ठपीडित रुग्णांची सकाळ
By admin | Published: March 17, 2017 11:41 PM