कोल्हापूर : सराफ व्यापारी संघाचा शहराच्या हद्दवाढीस पाठिंबा आहे, अशी माहिती गुरुवारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली. हद्दवाढ होईपर्यंत जागृतीपर बैठकांसाठी महाव्दार रोडवरील सराफ संघाचा हॉल मोफत दिला जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.
प्रस्तावित शहर हद्दवाढीच्या जागृतीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. सराफ संघाच्या हॉलमध्ये बैठक झाली. कॉमन मॅन आणि प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने बैठक झाली.
गायकवाड म्हणाले, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे गरजेची आहे. अनेक वर्षांपासून यावर निर्णय झालेला नाही. आता हद्दवाढ करण्याची वेळ आली आहे. यासाठी सराफ संघ नेहमी पाठीशी राहील. हद्दवाढीत येणाऱ्या गावांतील जागृतीसाठीही सहभाग घेतला जाईल.
कॉमन मॅनचे ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, राज्यातील अनेक शहरांची हद्दवाढ झाली. पण कोल्हापूर शहराची हद्दवाढ दीर्घकाळ झाली नाही. परिणामी शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. निधी मिळण्यात मर्यादा येत आहेत. यामुळे शहरालगतच्या गावांनी शहरात सामाविष्ट व्हावे. गावांच्या तुलनेत शहरात पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण आदी सुविधा चांगल्या आहेत. हद्दवाढीनंतर समाविष्ट होणाऱ्या गावांची उन्नती होईल. या सर्वांचा विचार करून शहर हद्दवाढीत स्वत:हून लगतच्या गावांनी सहभागी व्हावे.
प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी हद्दवाढीचे फायदे सांगितले. हद्दवाढ न झाल्याने विकास खुंटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी नगरसेविका माधुरी नकाते, सराफ संघाचे माजी अध्यक्ष बाबा महाडिक, संचालक प्रीतम ओसवाल, सुहास जाधव, किशोर परमार, सत्यजित सांगावकर, संग्राम साळोखे, शरद पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : ०२०९२०२१-कोल- हद्दवाढ बैठक
कोल्हापुरातील सराफ संघाच्या हॉलमध्ये गुरुवारी झालेल्या शहर हद्दवाढीसंबंधीच्या बैठकीत ॲड. बाबा इंदूलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
छाया - आदित्य वेल्हाळ