कोल्हापूर : दोघा सराईत चोरट्यांच्या टोळीमध्ये सहभागी होऊन २८ घरफोड्यांमध्ये सहभागी असणाऱ्या गुजरीतील एका सराफाच्या मुसक्या करवीर पोलिसांनी आवळल्या. संशयित सराफ अशोक मनोहर सावंत (वय ५०, रा. लक्ष्मी गल्ली, पापाची तिकटी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याचे साथीदार रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार सुनील श्रीहरी शिंदे (२४, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर), रामलू निळबा चव्हाण (३६, रा. तमलूर, देगलूर, जि. नांदेड) यांना यापूर्वी अटक केली आहे. या टोळीकडून एक किलो सोने, चार किलो चांदी असा ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार सुनील शिंदे, रामलू चव्हाण यांनी २ फेब्रुवारी २०१९ मध्ये खिडकीतून प्रवेश करून हत्याराने वार करून मीना विठ्ठल संकपाळ (५५) यांचा खून व विठ्ठल संकपाळ यांच्यावर खुनी हल्ला करून जबरी लूटमार केली होती. या दोघांकडे चौकशी केली असता त्यांचा साथीदार कोल्हापुरातील पापाची तिकटी येथे राहणारा सराफ व्यावसायिक संशयित अशोक सावंत हा दोघांसोबत घरफोडी करायचा. त्याची गुजरी परिसरात सराफांशी ओळख होती. तो चोरीचे सोने विक्रीसाठी मदत करायचा. पोलिसांनी त्याच्याही २१ नोव्हेंबरला मुसक्या आवळल्या. तपासात त्यांनी जिल्ह्यातील २८ घरफोड्यांची कबुली दिली. या तिघांनी चोरीच्या पैशातून आलिशान घरे बांधल्याचे तपासात पुढे आले आहे. करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, करवीरचे निरीक्षक सुनील पाटील, सहायक फौजदार अरविंद कांबळे, उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, विक्रम चव्हाण, प्रशांत माने, भोसले, राजेंद्र जरळी, सुहास पाटील, गुरुप्रसाद झांबरे, दीपक घोरपडे, युक्ती ठोंबरे, राम माळी, आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
सराफच निघाला घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 1:09 AM