इचलकरंजी : भारतीय मानक ब्युरो या संस्थेने जून २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांवर सक्तीचे हॉलमार्क लागू केले आहेत. मात्र, हे नियम लागू करताना केंद्र सरकारने अनेक जाचक अटी लादल्या आहेत. याच्या निषेधार्थ येथील सर्व सराफ व्यापाऱ्यांनी सोमवारी एक दिवस दुकान बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन इचलकरंजी सराफ व सुवर्णकार असोसिएशनने प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, प्रत्येक दागिन्यांवर युनिक आयडेंटी नंबरद्वारे प्रत्येक व्यवहारात ग्राहकांची माहिती अपलोड करावी लागते. पीआयएस पोर्टलवर ऑनलाईन माहिती नोंद करणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागातील छोट्या सराफांना अद्याप संगणक सॉफ्टवेअर वापरता येत नाही. हॉलमार्क करतेवेळी वेळखाऊ व किचकट प्रक्रिया करावी लागते. दागिन्यांवर ज्वेलर्सचे कोणतेही ओळख चिन्ह नाही. हॉलमार्क केल्यानंतर दागिन्यांवर बदल करण्यास परवानगी नाही, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात सचिन देवरूखकर, राजू कदम, सचिन कापसे, प्रमोद कुंभार, उदय लोले आदींचा समावेश होता.