कोल्हापूर : सार्वजनिक सुव्यवस्थेच्या विरोधातील गंभीर गुन्ह्यामध्ये सक्रिय असणाऱ्या भास्कर डॉन गँग या संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख अमोल महादेव भास्कर(रा.जवाहर नगर,कोल्हापूर) याच्याविरुद्ध एम. पी.डी. ए अंतर्गत कोल्हापूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतीचे कारवाई केली.शुक्रवारी सकाळी त्यास पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक बलकवडे म्हणाले, सराईत गुंड अमोल भास्कर याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारी व्यक्ती, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजर करणाऱ्या व्यक्ती अशा विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९१८ थोडक्या एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबचा प्रस्ताव राजारामपुरी पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी शहर उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्यामार्फत सादर केला.
यात अमोल भास्कर याचेविरुद्छे गुन्हे अभिलेख पडताणी केली असता त्याच्याविरोधात राजारामपुरी, जुना राजवाडा,कोल्हापूर शहर, करवीर तालुका परिसरातील सार्वजनिक ठिकाणी खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवणे, दुखापत किंवा गैर परिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण करून नुकसान करणे,, जबरी चोरी, आदेशाचा भंग करणे, बेकायदेशीर जमाव करणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे, जमीन बळकावणे, प्राणघातक हत्यार बाळगून, गुन्हा करणेसाठी संगनमत करणे , बेकायदेशीर खासगी सावकारी, महिलांच्याविषयी घृणास्पद प्रकार करणे, आदी गुन्हे नोंद आहेत.
त्यानुसार छाननी प्रस्ताव स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची मान्यता व मार्फतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे अंतिम मंजूरीसाठी सादर केला. प्रस्ताव छाननीनंतर भास्करच्या विरोधातील चढत्या क्रमाने गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहता त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाईचे आदेश पारीत केले. त्यानूसार राजारामपुरी पोलिसांकडे पुन्हा पाठविले होते. गुरुवारी (दि.१७) स्थानबद्धता आदेशाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून संशयित अमोल भास्कर निपाणी मार्गे कणकवली, कोकण व तेथून पुढे पलायन करण्याचा प्रयत्नात होता. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर व कणकवली पोलिसांनी समन्वय साधून ताब्यात घेतले. त्यानंतर आदेशाची अंमलबजावणी करून शुक्रवारी पहाटे पुण्याकडे रवाना करीत सकाळी येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाखल केले. त्याची ही स्थानबद्धता एक वर्षे कालावधीसाठी आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, अनिल तनपुरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सुनिल कवळेकर, सचिन गुरखे, चंद्रकांत नणवरे, सचिन देसाई, सिधुदुर्ग पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी कामगिरीत सहभाग घेतला.