कोल्हापूर : सायबरनजीक मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी आरक्षित केलेल्या ४० हजार चौरस मीटर जमिनीवरील आरक्षण रद्द केल्याचे परिपत्रक नगर रचना विभागाने जारी केले. संबंधित जागा सार्वजनिक आणि निमसार्वजनिक वापरासाठी खुली केली असून, यातील १.८५ हेक्टर आर जमीन सारथी संस्थेला शैक्षणिक वापरासाठी देण्यास मान्यता देण्यात आली. दरम्यान, जिल्हा बार असोसिएशनने खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील जागेवरील दावा भक्कम केला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी सायबरनजीक रि. स. क्रमांक ३७४ ते ३७८ मधील ४० हजार चौरस मीटर जागा आरक्षित केली होती. मात्र, ती जागा अपुरी असल्याचे मत जिल्हा बार असोसिएशनने व्यक्त केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शेंडा पार्क येथील रि. स. क्रमांक ५८९ ते ७०९ मधील सुमारे ४० एकर पर्यायी जागा खंडपीठासाठी आरक्षित केली. सायबर येथील जागेचा अन्य कारणांसाठी वापर करता यावा, यासाठी त्यावरील खंडपीठाचे आरक्षण काढणे आवश्यक होते.त्यानुसार मार्च २०२२ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सायबर जवळच्या जागेतील खंडपीठाचे आरक्षण रद्द करून त्यातील १.८५ हेक्टर आर जमीन सारथीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जागा मुलांचे वसतिगृह आणि इतर शैक्षणिक वापरासाठी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक जारी झाले. यामुळे सारथीला जागा मिळण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे.बार असोसिएशनचा दावा भक्कमशेंडा पार्क येथील ४० एकर जागा खंडपीठासाठी आरक्षित झाली आहे. त्या जागेबद्दल कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवू नये, यासाठी बार असोसिएशनकडून पाठपुरावा सुरू आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसह शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई यांनी दिली.
कोल्हापुरातील सायबरजवळील खंडपीठाची आरक्षित जागा सारथीला मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:51 AM