कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मराठा समाजाला दिशा दर्शक ठरेल. असा विश्वास व्यक्त करत मराठा समाजासाठी जे जे करावे लागेल त्यात महाविकास आघाडी सरकार मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या खांद्याला खांदा काम करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पंतप्रधानांकडे विनंती केली असून, राज्य सरकार मराठा समाजासाठी आवश्यक ते निर्णय घेत आहे. असेही त्यांनी असल्याचेही त्यांनी सांगितले.कोल्हापूरातील राजाराम कॉलेजमधील प्रि. आय.एस.एस. ट्रेनिंग सेंटरच्या परिसरातील कमवा व शिका योजनेच्या इमारतीत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महान राष्ट्रपुरुषांच्या केवळ आठवणींचा जागर करून चालणार नाही. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून जाण्याची आवश्यकता आहे.
मागील शनिवारी खासदार युवराज संभाजीराजे यांच्यासोबत बैठक घेऊन सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तत्काळ संभाजीराजे यांनी शाहू जयंती दिवशी उपकेंद्र सुरू करण्यासाठी शासनाची मानसिकता हवी, असे सांगितले. आघाडी सरकारने त्याकरता आवश्यक ती पावले उचलत आठ दिवसांत उपकेंद्रे सुरू केले आहे."मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, संघर्ष व संवाद कधी साधायचा ज्याला कळले तोच खरा नेता असतो. केवळ आदळाआपट करणे म्हणजे नेतृत्व नव्हे. खासदार संभाजीराजे यांचे कौतुक करण्यासारखे आहे. समाजाच्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर येताना राज्य शासनाबरोबर त्यांनी संवाद साधण्याचे महत्वपूर्ण काम केले. मी शिवसेना प्रमुख असून, न्यायासाठी रस्त्यावर उतरणे आमच्याही रक्तात भिनले आहे. आम्ही सर्व एकाच विचाराचे लेकरे आहोत. संवाद व संघर्ष कधी करायचा हे आम्हाला चांगले कळते. असे ही त्यांनी स्पष्ट केले.खासदार संभाजीराजे म्हणाले, सारथीचे उपकेंद्र कोल्हापूरात सुरु केल्याबद्दल महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभारी आहे. मुक आंदोलनानंतर पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आयोजित करून दिली. त्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कोल्हापूरातील राजाराम कॉलेजमध्ये २ एकर जागा या उपकेंद्राकरीता दिली आहे. त्यात वाढ करून पाच एकर तरी करावी. अशी मागणी यानिमित्त केली.ग्रामविकास मंत्री हसन मूश्रीफ म्हणाले, शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हे उपकेंद्र सुरु होत आहे. ही आभिमानाची गोष्ट आहे. खासदार संभाजीराजे यांच्या मुक आंदोलनानंतर पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासोबत बैठकीचा शब्द दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानूसार सारथीचे उपकेंद्र आठ दिवसांत कोल्हापूरात सुरु झाले. देशाला समतेचा संदेश देणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांची सर्व दुर ख्याती आहे. त्याच शुभ दिवशी कोल्हापूरला हे केंद्र सुरु होत आहे. यासाठी दोन एकर जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून तत्काळ मिळाली.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, अशोक काकडे, अशोक पाटील , जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.