(फोटो-२४०२२०२१-कोल-सरदार नाळे)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील सरदार बळीराम नाळे यांना मीरा भाईंदर-वसई विरार येथे पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. केवळ गुणवत्ता व जिद्दीच्या बळावर दहा वर्षांत रेल्वे पोलीस ते पोलीस निरीक्षक पदापर्यंत त्यांनी झेप घेतली.
सरदार नाळे यांनी पदवी घेतल्यानंतर अक्षरश: झपाटल्यासारखा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही आई-वडिलांनी काही वेळा स्वत:च्या पोटाला चिमटा देत त्यांना शिक्षणासाठी पैसे दिले. पहिल्या परीक्षेत दोन तर दुसऱ्या परीक्षेत केवळ एका गुणाने पीएसआयची संधी हुकली. मात्र, ते उमेद हरले नाहीत. तोपर्यंत २००७ ला रेल्वे पोलीस म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र, स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न सोडला नाही आणि अखेर यशाला गवसणी घालत महाराष्ट्रात इतर मागास प्रवर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नवी मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले. तिथे वाहतूक शाखेतही काम केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक म्हणून नागपूर शहरात पदोन्नती मिळाली. तिथेही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत बड्या गुंड्यांना मोका लावून आपला खाक्या दाखविला. आपले कर्तव्य चोख बजावत असताना पोलीस दलांतर्गत होणाऱ्या स्पर्धेतही ते अव्वल राहिले. नवी मुंबई येथे पासपोर्ट, विदेशी नागरिक नोंदणी विभाग, सरकारी व खासगी नोकरी चारित्र्य पडताळणी विभागात काम करताना त्यांनी बेकायदेशीर राहणाऱ्या विदेशी नागरिकांना शोधून हद्दपार करण्याची सर्वाधिक कारवाया केल्या. दहा वर्षांत तब्बल ११० खात्यांकडून बक्षिसे त्यांनी पटकावली. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली.
कोट-
कष्टाची तयारी आणि प्रामाणिकपणे काम केले तर फळ मिळतेच. मला उभा करण्यासाठी आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टामुळेच आतापर्यत जे काही मिळाले ते उत्कृष्टच आहे.
- सरदार नाळे (पोलीस निरीक्षक)