निपाणी : सौंदत्ती रेणुका देवीच्या यात्रेसाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्र डेपोच्या बसला मागून येणाऱ्या बसने धडक दिल्याने ४० जण जखमी झाल्याची घटना कणगलेजवळ घडली. जखमींना संकेश्वर, कणगला सरकारी रुग्णालय व निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काही जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. तर काहींना उपचार करून घरी सोडले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र महामंडळाची गारगोटी आगाराची बस ही शिवणेवाडी (ता. भुदरगड) भाविकांना घेऊन सौंदत्ती रेणुका यात्रेसाठी जात होती. निपाणीहून संकेश्वरकडे जात असताना बस कणगलेजवळच्या उड्डाण पुलानजीक आली असता अचानक रेडा आडवा आल्याने त्याला चुकविण्यासाठी चालकाने जोरात ब्रेक लावला. यावेळी मागून येणारी राधानगरी आगाराची बस समोरच्या बसला जोरात धडकली. यामध्ये सरवडे (ता. राधानगरी) येथील सौंदत्ती बसमधील ४० प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने निपाणी, संकेश्वर व कणगला येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. निपाणी रुग्णालयात २६ जखमींवर उपचार करून अधिक उपचारार्थ कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर काही भाविकांनी सौंदत्तीला जाण्याचा बेत घातला. तर काही प्रवाशांनी घरी जाणे पसंद केले. या अपघातात मागील एसटीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. कणगला येथील स्थानिक नागरिक व पूंज लॉईड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यात मदत केली.
सरवडेतील ४० रेणुका भक्त अपघातात जखमी
By admin | Published: February 03, 2015 12:33 AM