साडी ही ऋतुमान तसेच सण-समारंभानुसार वापरली जाते. रंगीबेरंगी साड्यांनी स्त्रियांचे कपाट भरलेले असते. कितीही साड्या असल्या तरी त्या कमीच पडतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांना साड्या नेसून झाल्याने पुढील कार्यक्रमाला परत कोणती साडी नेसू, असा त्यांच्यापुढील यक्ष प्रश्न असतो. मग त्यांची आई, बहीण, मैत्रिणींकडे साड्यांची अदलाबदल चाललेली असते. तरीही लेटेस्ट फॅशनकडे त्यांचा जास्त ओढा असतो. त्यामुळे त्यांची पाऊले आपोआपच साड्यांच्या दुकानाकडे वळतात. स्त्रियांना पसंतपडेपर्यंत त्यांच्या पसंतीच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या शांतपणे, हसतमुखपणे दाखविणे हे दुकानदारांचे व तेथील कामगारांचे कौशल्यच होय. कारण साडी खरेदी हा स्त्रियांचा वीकपॉइंट असतो मग ती साडी घरगुती वापराची असो वा सणवार, कार्यक्रमासाठी वा देवीसाठी ओटी भरायला घ्यायची असो. त्यासाठी त्या तासन्तास वेळ काढू शकतात व साड्यांच्या विविधरंगी रंगात रंगून जातात. नव्या नवरीच्या साडी खरेदीचे कोण कौतुक असते. ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा’ हे गाणे या वेळी आपोआपच ओठावर येते. लग्नाच्या बस्त्याला तर खूप महत्त्व असते. सासरचे, माहेरचे नातेवाईक व प्रत्येकाच्या अगदी मानाप्रमाणे साड्या घेतल्या जातात. याचबरोबर मैत्रिणीने किंवा एखाद्या नातेवाईक स्त्रीने घेतलेल्या साडीपेक्षा आपली साडी कोणत्याही कार्यक्रमात भारी, जास्त किमतीची कशी ठरेल असाही थोडासा त्यांचा स्वभाव असतो. सध्या रोज वापरावयाच्या सिन्थेटिक साड्या, सिफॉन, लुगडी, रेशमी, बांधणी, नारायणपेठ, कांजीवरम्, बांधणी, कशिदा इ. साड्यांचे विविध प्रकार आहेत. पैठणी तर कोणत्याही स्त्रीला भुरळ पाडते. साड्यांच्या किमती त्या साडीच्या प्रकारानुसार ठरतात. सध्या साड्यांना नेटच्या तसेच खडे, मोती, पॅचेस, मोठ्या लेस, लटकन अशी फॅशन आहे. कॉलेजमध्ये जाताना सध्या जीन्स, लेगिग्ज, जेगिंग्ज व टॉप, शॉर्ट स्कर्ट जरी फॅशन असली तरी मुली गौरी-गणपती, दिवाळी, सारी डे या दिवशी आवर्जून साड्या नेसतात. वेगवेगळ्या फॅशनेबल साड्या नेसून घोळक्याने आपल्याच दिमाखात जातात तेव्हा तरुण मुलांची ‘देखा उसे साडी मे तो दिल धडकने का एहसास हुआ, मन मे पल रहे ख्वाबों को संभालना आसान न हुआ।' अशी तरुणांची जवां धडकन नक्कीच तेज होत असणार. पत्नीला खूश ठेवायचे तर साडी खरेदी हे पतीला ही माहीतच असते. त्यामुळे तीचा वाढदिवस, दिवाळी, दसरा, घरातील लग्नकार्य यावेळी आपोआपच साडी खरेदी केली जाते. साड्यांचा व्यवसाय हा भारतातील एक मोठा व्यवसाय आहे व यावर हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे हा एक वेगळा विषय होऊ शकतो.
स्त्रियांकडे पावसाळ्यातील हलक्या व लगेच वाळणाऱ्या, हिवाळ्यातील उबदार व उन्हाळ्यातील सुती साड्या त्याचबरोबर त्यावरील बांगड्या, टिकल्या, दागिन्यांचे सेट असा विविध प्रकारचा खजाना असतो. सुती साड्या ह्या थंडीत उबदार, तर उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करते. स्त्रियांच्या कपाटातील साड्या या नुसत्याच साड्या नसतात तर त्यात त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. मग तो लग्नातील शालू असो वा पहिल्या दिवाळीची साडी, डोहाळजेवणाची, बारशाची, मानाने नेसवलेल्या साड्या अशा विविध आठवणीचा तो समृद्ध ठेवा असतो व ती भावनात्मकरीत्या त्या साडीत गुंतलेली असते. आईच्या साडीत ममता, वात्सल्य असते. साड्यांची दुनिया मनमोहक नेहमीच आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण असते.
अशी ही स्त्रीचे स्वतःशी नाते जपणारी साडी. विविध रंगी, विविध ढंगी, स्त्रियांना मोहवणारी, खुलवणारी.
- साै. अनिशा अनिल कोटगी
(श्री विवेकानंद योग व ध्यान केंद्र, गडहिंग्लज)