कोल्हापूर : सरकी तेलाने या आठवड्यात एकदम उसळी खाल्ली असून, किरकोळ बाजारात ९० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. भाजीपाल्याचे दर आवाक्यात आले असून, कांदा मात्र अद्याप चढाच राहिला आहे. गाजरांची आवक सुरू असून, लालभडक गाजरे ४० रुपये किलो आहेत. किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये किलोपर्यंत दर आहे. फळमार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल पाहावयास मिळत आहे.डाळीचे दर साधारणत: स्थिर राहिले असले, तरी मध्यंतरी काहीशी घसरलेली तूरडाळ पुन्हा १०० रुपयांवर पोहोचली आहे. हरभरा डाळ ६५, मूगडाळ १००, मूग ८०, मटकी ६० रुपयांपर्यंत स्थिर आहे. खोबरे १६० रुपये, तर शाबू ७० रुपये दर कायम आहे. किरकोळ बाजारात साखर ३८ रुपये किलो आहे. सरकी तेलाच्या दरात वाढ झाली असून, साधारणत: ८० ते ८५ रुपयांवर असणारा दर ९० रुपयांवर पोहोचला आहे.भाजीपाल्याचे दर गेल्या आठवड्यात चांगलेच तेजीत होते. त्या तुलनेत आता दरात थोडी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात वांगी ४०, ओली मिरची ४०, ढब्बू ३०, गवार ६०, कारली ४०, भेंडी ४० रुपये किलो दर राहिला आहे. ओला वाटाण्याची आवक वाढली असून, दरात थोडी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात ५० रुपये किलो असला, तरी किरकोळ बाजारात मात्र हा दर ८० रुपयांवर आहे. उन्हाळ्यात काकडीची आवकही सुरू आहे.
साधारणत: काट्याच्या काकडीपेक्षा या काकडीला मागणी असते, सध्या ४० रुपये किलो दर आहे. गेल्या आठवड्यापेक्षा कोथिंबिरीची आवक वाढल्याने दर थोडे कमी झाले असून, २० रुपये पेंढीचा दर आहे. हरभरा भाजी व पेंढीची आवकही सुरू असून, १0 रुपये पेंढीचा दर आहे. मध्यंतरी २५ रुपयांवर पोहोचलेली मेथी थोडी आवाक्यात आली असून १० ते १५ रुपये पेंढीपर्यंत दर खाली आला आहे. पोकळा, शेपूचे दरही स्थिर आहेत.फळमार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. संत्री, माल्टा, चिक्कू, पेरू, सफरचंद, डाळींब, सीताफळ, बोरे, पपई, आदी फळांनी बाजार फुलला आहे. विशेष म्हणजे द्राक्षांची आवक सुरू झाली असून, अद्याप गोडीला थोडी कमी असल्याने ग्राहकांच्या उड्या पडताना दिसत नाहीत.टोमॅटो २० ला दीड किलो!महापुरात टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्यानंतर आवक एकदमच मंदावली होती; पण आता हळूहळू आवक वाढू लागली असून, रविवारी कोल्हापूर बाजार समितीत तब्बल ३.३0 हजार कॅरेट टोमॅटोची आवक झाली होती; त्यामुळे किरकोळ बाजारात २० रुपयांना दीड किलो असा दर राहिला.