लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारूण : उखळू (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाच्या केबिनला शुक्रवारी (दि. २१) सरपंचांनी टाळे ठोकले आहे. ग्रामसेवक बदलून मिळत नाही तोपर्यंत हे टाळे खोलणार नसल्याची भूमिका सरपंचांनी घेतली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
उखळू येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक कृष्णात माने हे कामामध्ये नवीनच असल्यामुळे त्यांना प्रशासकीय कामाचा फारसा अनुभव नाही. काम करताना त्यांना वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यामुळे अकार्यक्षम माने यांची तत्काळ बदली करण्यात यावी व त्यांच्या जागी गावाला कायमस्वरूपी कार्यक्षम ग्रामसेवक देण्यात यावा, अशी मागणी सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीचा प्रशासन स्तरावर कोणताच विचार होत नसल्याने सरपंचांनी ग्रामसेवकाच्या केबिनलाच टाळे ठोकले.
कृष्णात माने (ग्रामसेवक-उखळू)
कामात नवीन व अनुभवाचा अभाव असल्यामुळे माझ्या हातून कोणतेही नियमबाह्य काम घडू नये व ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शी व्हावा यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. यामुळे कामांमध्ये थोडाफार विलंब होत असेल. कदाचित हीच कार्यशैली सरपंचांना खटकत असावी.
राजाराम मुठल (सरपंच-उखळू)
१४ व्या वित्त आयोगाची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. संबंधित ग्रामसेवकास १५ व्या वित्त आयोगाचा साधा इस्टिमेंटचा ठराव देता आलेला नाही. ग्रामपंचायतीचे कोणतेच काम होणार नसेल तर अशा ग्रामसेवकासोबत मी ग्रामपंचायत चालवू शकत नाही.
फोटो :
उखळू (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाच्या केबिनला सरपंचांनी असे टाळे ठोकले आहे.