कोल्हापूर : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये ३१ जुलै रोजी शिर्डी येथे सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अहमदनगर सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गीते यांनी ही माहिती दिली. सरसकट प्रत्येक सरपंचांना आॅगस्ट महिन्यापासून पाच हजार रुपये मानधन जाहीर होण्याची शक्यता आहे.राज्यातील सुमारे २८ हजार सरपंच आणि उपसरपंच अशा ५० हजार जणांनी या परिषदेला उपस्थित राहावे, असे नियोजन सुरू आहे. तसेच ३५१ पंचायत समित्यांचे सभापती आणि ३४ जिल्हा परिषदांचे अध्यक्ष यांनाही या परिषदेसाठी पाचारण करण्यात आले आहे.
गेली काही वर्षे सरपंचांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत होती. उत्पन्नाच्या आधारे याआधी मानधन दिले जात होते. मात्र या सरपंच परिषदेमध्ये सरपंचांना सरसकट पाच हजार रुपये मानधनाची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे.यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पश्चिम महाराष्ट्र सरपंच संघटना संघटक शिवाजी मोरे, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष सागर माने, महिला आघाडीप्रमुख राणीताई पाटील, करवीर तालुकाप्रमुख सचिन चौगुले उपस्थित होते.ग्रामपंचायत निधीतून प्रवासखर्चया परिषदेसाठी येण्यासाठी सरपंच, उपसरपंच यांना ग्रामपंचायत स्वनिधीतून खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसे परिपत्रक २४ जुलै रोजी ग्रामाविकास विभागाने काढले आहे. नेमका किती प्रवासखर्च देय राहील, याबाबत त्या-त्या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्'ातून २५५२ सरपंच, उपसरपंच या परिषदेसाठी उपस्थित राहणार असून, यासाठी ३४ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.