लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सरपंच आरक्षणाच्या सोडतीवर हरकत घेतलेल्या जिल्ह्यातील करवीरमधील कोगे, खुपिरे, उंडी (ता. पन्हाळा) शिरोळमधील शिरटी, मजरेवाडी आणि भूदरगडमधील फणसवाडी या सहा ग्रामपंचायतींची सरपंच निवडीची सभा स्थगित करण्याचे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिले. या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. अन्य ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीच्या सभा ठरल्याप्रमाणे ९ तारखेला होणार आहेत.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर २७ जानेवारीला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली; परंतु निवड स्थगित केलेल्या सहा ग्रामपंचायतींचे आरक्षण रोटेशननुसार पडलेले नसल्याच्या कारणास्तव त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन राज्यातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूर व नाशिकमधील एकूण ३५ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीच्या सभा स्थगित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या ग्रामपंचायतींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घ्यावी व योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेशात नमूद आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींची सरपंचपदाच्या निवडीची सभा स्थगित झाली आहे. ॲड. धैर्यशील सुतार यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने बाजू मांडली.
सरपंच निवड स्थगित झालेली गावे
कोगे व खुपिरे (ता.करवीर)
उंड्री (ता. पन्हाळा)
शिरटी, मजरेवाडी (ता. शिरोळ)
फणसवाडी (ता. भूदरगड)