कोल्हापूर : ज्या गावात बालविवाह होतील तेथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व वयाच्या खोट्या नोंदी करणारे नोंदणी अधिकारी यांनी हा प्रकार लपवल्यास त्यांना जबाबदार धरून त्यांची पदे तत्काळ रद्द करावीत व अशी शिफारस महाराष्ट्र शासनास केल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पश्चिम महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याचेही त्यांनी नमूद केले.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील(गृह), जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील, पोलीस आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत महिला व बालविकास विभागाच्या महिला समुपदेशन केंद्राला भेट देऊन कामाची माहिती घेतली.चाकणकर म्हणाल्या, बालविवाह ही गंभीर समस्या असून, त्यामुळे मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. बालविवाहाच्या घटना वेळीच रोखणे आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत. या घटना रोखण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असून, अशा घटना आढळल्यास ग्रामसेवकांना जबाबदार धरून कारवाई करावी, अशा सूचना देखील केल्या.तर, बालविवाहाच्या घटना घडू नयेत यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, महिलांवर कामाच्या ठिकाणी अत्याचार होऊ नये, यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये 'अंतर्गत तक्रार निवारण समिती' स्थापन झाल्याची खात्री पोलीस विभागाने करावी. भरोसा सेलकडील प्रकरणांत वेगाने समुपदेशन उपलब्ध करून द्या. समुपदेशनाला उपस्थित न राहणाऱ्यांना कडक नोटीस बजावा, कौटुंबिक हिंसाचारामुळे पीडित व घराचा आधार नसलेल्या महिलांना आधारगृह, तेजस्विनी महिला वसतिगृह व सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रस्ताविकेतून जिल्ह्यातील महिलांविषयक गुन्ह्यांची व गुन्हे रोखण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
बालविवाह होतोय, सरपंच, ग्रामसेवकावर होणार कारवाई; रूपाली चाकणकरांनी केली शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 5:51 PM