दत्तवाड : नूतन सरपंच व सदस्य गावातील अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देत असून, कोरोना काळात नागरिकांचे आरोग्यसेवेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. जुनी प्रस्तावित विकासकामे स्वत:च्या नावावर खपवत आहेत. यातून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी सरपंच बाबासो वनकोरे यांनी केला.
टाकळवाडी (ता. शिरोळ) येथे गट नंबर ५९० मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपासून अतिक्रमण सुरू असून, निवडणूक काळातच रात्रीत तेथे घरे बांधून अतिक्रमण केले आहे. याबाबतची तक्रार तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. सत्तेवर असलेले सरपंच यांचा पुत्रच या अतिक्रमणाला प्रोत्साहन देत आहे, तर चाळीस एकर जागेमध्ये ५० पेक्षा जास्त घरे बांधून नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत सत्ताधारी पक्षातील काही सदस्य नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. सरकारी जागेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरपंच व सदस्य यांच्यावर असताना तेच आपल्या नातेवाइकांना अतिक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, ही बाब गंभीर आहे. तर गावात विकासकामे ठप्प झाली आहेत. गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतरही सर्वपक्षीय दक्षता समितीची बैठक झाली नाही. यामुळे त्यांना गावच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे गटविकास अधिकारी शंकर कवितके व तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी सरपंच, सदस्यांवर कारवाई करून अतिक्रमणमुक्त गाव करावे, अशी मागणी वनकोरे यांनी केली. यावेळी कुशाल कांबळे, चंद्रकांत निर्मळे, बाळकृष्ण चिगरे, अनिल कांबळे उपस्थित होते.