कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी साखर कारखान्याचे वजन काटे तपासण्यासाठी भरारी पथक नेमून आदेश दिले आहेत. यापैकी वैध मापनशास्त्र निरीक्षक ए. ए. शिंगाडे यांच्या नेृत्त्वाखाली प्रथम लेखापरीक्षक साखर आयुक्त कोल्हापूरचे यु. आर. कुंभार, कापशीचे मंडल अधिकारी एस. एम. जंगले, मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार पो. निरीक्षक एस. एस. चव्हाण सहभागी झाले होते.
यावेळी वजन काट्यावर वजन होऊन गव्हाणीकडे गेलेल्या चार उसाच्या वाहनांची वजन पावती ताब्यात घेऊन त्यांची पुन्हा वजन केले असता कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही. याशिवाय २० किलोप्रमाणे पाच हजार किलो वजनाची प्रमाणित वजने काट्यावर ठेवून पुन्हा तपासणी केली असता या मध्येही कोणतीच तफावत आढळून आली नसल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.
याशिवाय प्रत्येक वाहनचालकाला वजन दर्शविणारे दर्शक केबिन बाहेर लावले आहेत, उसाच्या भरलेल्या व रिकाम्या वाहनाचे एकाच वजन काट्यावर वजन होत आहे का, या सर्व बाबींचा विचार करून कारखान्याचा वजन काटा बिनचूक असल्याचे प्रशस्तिपत्र व अहवाल कारखान्याकडे दिला.
याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, चीफ इंजिनिअर हुसेन नदाफ, विभाग प्रमुख भूषण हिरेमठ, केनयार्ड विभाग प्रमुख अमर माने उपस्थित होते.