शाहू क्रीडांगण कागल येथे सोमवारी झालेल्या सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना अश्वमेध संघाने ३१.१ षटकांत सर्वबाद १११ धावा केल्या. यात हर्ष आमणे २६, सुधीर तोडकर २४, आदित्य चव्हाण २० व प्रथमेश निगडे याने १९ धावा केल्या. मोगणे सहाराकडून गोलंदाजी करताना सुदर्शन कुंभारने पाच, रचित चौगुलेने दोन, स्मित पाटीलने, श्रीराज चव्हाण व प्रथमेश साठे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना मोगणे सहारा संघाने हे आव्हान ११.३ षटकांत ३ बाद ११६ धावा करीत सहजरीत्या पार करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. यात यशराज कोरोचे नाबाद ४२, श्रीराज चव्हाण नाबाद २६, प्रथमेश साठे १४, रचित चौगुले याने ११ धावा केल्या. ‘अश्वमेध’कडून अभिषेक इंचाळने तीन बळी घेतले. मात्र, त्यांच्या इतर गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही.
दुसरा सामना राजाराम काॅलेज मैदानावर सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशन व शाहू स्पोर्टस् ॲकॅडमी यांच्यात झाला. यात सागरमाळ स्पोर्टस्च्या भेदक गोलंदाजीपुढे शाहू स्पोर्टस्ला ३०.५ षटकांत सर्वबाद ८० धावा करता आल्या. यात सौरभ जगतापने २०, अभिषेक मंडलिक व राहुल शहा यांनी प्रत्येकी १३ धावा केल्या. सागरमाळ कडून अथर्व पोवारने तब्बल सहा, तर चैतन्य मोडकरने दोन व रुद्र लोंढेने एक बळी घेतला. उत्तरादाखल सागरमाळ स्पोर्टस्ने हे आव्हान केवळ ११.४ षटकांत ३ बाद ८३ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. यात अलोक कानिटकरने नाबाद ५६ धावा केल्या. शाहू स्पोर्टस्कडून धीर मेहता, प्रथम वास्कर, विराज चव्हाण यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र, त्यांच्यासह इतर गोलंदाज सागरमाळ संघास विजयापासून रोखू शकले नाहीत.