विश्र्वास पाटील कोल्हापूर : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत कोण निवडून येणार याबद्दलही पैजा लागत असल्या, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र एका वेगळ्याच प्रश्नाने पोखरले आहे. या पक्षाचे दोन दिग्गज नेते आमदार सतेज पाटील व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यात ऐक्य होणार का? याबद्दलच त्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील (गोकुळ) सत्ता हा या ऐक्यातील महत्त्वाचा अडसर आहे. गोकुळप्रश्नी पी. एन. पाटील काय भूमिका घेतात, यावरूनच या दोघांतील सख्य, विधानसभा निवडणुकीतील या दोघांचे व पक्षाचे यश व जिल्ह्यातील काँग्रेसचे भवितव्यही निश्चित होणार आहे.सध्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद प्रकाश आवाडे यांच्याकडे आहे. त्यांचे व या दोघांचेही आता चांगले संबंध आहेत; त्यामुळे जिल्ह्यात अन्य नेत्यांत (आहेत तरी कोण म्हणा) आता फारशी बेदिली नाही; परंतु ज्यांचा आजही पक्षाच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे, असे पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्यातच आज गैरविश्वासाचे वातावरण आहे.
लोकसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विरोध केला. पी. एन. पाटील यांनी मात्र महाडिक यांच्याबद्दलचा जुना अनुभव फारसा चांगला नसतानाही त्यांच्यासाठी काम केले. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी असली, तरी कोल्हापुरात मात्र सामान्य शेतकरी, गोरगरीब जनतेला मात्र ती गोकुळ दूध संघाचे भवितव्य ठरविणारी असल्याचे वाटले.
संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक हे संघ मल्टिस्टेट करण्यास निघाले आहेत. तसे झालेच, तर संघाची मालकी महाडिक कुटुंबाकडे जाईल व त्यातून जिल्ह्याच्या अर्थकारणाचा, विकासाचा व राजकारणाचाही कणा असलेली ही संस्था अडचणीत येईल, असे लोकांना वाटले. संघाच्या वार्षिक सभेत सामान्य माणसाला त्याविरोधात काही करता आले नव्हते; त्यामुळे त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. आता विधानसभा व गोकुळ निवडणुकीपर्यंत हा मुद्दा असाच तापत राहणार आहे.लोकसभेच्या निकालानंतर पी. एन. पाटील यांचा मल्टिस्टेटबद्दलचा आग्रह कायम राहणार, की ते आपली भूमिका बदलणार याचा त्यांच्या विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होणार आहे. पी. एन. व सतेज यांनी एकत्र यावे, असे सच्चा काँग्रेस कार्यकत्यांना वाटते; परंतु त्यात आजतरी गोकुळच्या सत्तेचीच आडकाठी आहे.
गोकुळच्या सत्तेवरून पडलेल्या या दोन नेत्यांतील दरी तशीच कायम राहिल्यास त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहेत; त्यामुळे या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन पक्षाच्या व व्यक्तिगत राजकीय भवितव्याचाही विचार करून एकत्र यावे, असे कार्यकर्त्यांना वाटते. हे दोघेही नेते सुज्ञ आहेत; त्यामुळे याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. ते परस्परांना किती विश्वास देतात, यावरच या घडामोडी अवलंबून असणार आहेत.
खरी मेख इथेच...आता ‘गोकुळ’मध्ये महाडिक व पी. एन. हेच प्रमुख नेते आहेत. या सत्तेचा मोठा लाभ महाडिक यांच्या राजकारणाला व व्यक्तिगत अर्थकारणालाही होत असला, तरी पी. एन. आपल्यासोबत नाही राहिले तर संघाची सत्ता ताब्यात राहत नाही, हे त्यांना अगदी पक्के माहीत आहे; त्यामुळे गोकुळमध्ये ते पी. एन. यांना दुखावत नाहीत. पी. एन. यांच्या राजकारणासाठीही गोकुळची सत्ता हाच मुख्य कणा आहे. ते भोगावती कारखान्याचे अध्यक्ष असले, तरी तिथे खिशातील पाकीट काढून चहा प्यावा लागतो, अशी कारखान्याची आर्थिक स्थिती आहे.
पी. एन. - सतेज एकत्र आल्यास गोकु ळची सत्ता काँग्रेसकडे राहू शकते. पी. एन. हे त्या सत्तेचे मुख्य नेते होऊ शकतात; परंतु आता जसा त्यांचा तिथे शब्द चालतो, तसा शब्द सतेज पाटील यांच्यासोबत एकत्र आल्यास चालणार का? ही शाश्वती पी. एन. यांना वाटत नाही हीच खरी हे दोघे एकत्र येण्यातील मेख आहे.
‘मनपा’ला ‘मुनपा’चे आव्हान...पी. एन. यांची आतापर्यंतची तरी भूमिका मल्टिस्टेटच्या बाजूने राहिली आहे. सतेज पाटील हे त्याविरोधात थेट मैदानात उतरले आहेत. या लढाईत त्यांना पी. एन. यांचे राजकीय विरोधक व करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे मोठे पाठबळ आहे. गोकुळ दूध संघातील पुढील निवडणूक ही सतेज पाटील, चंद्रदीप नरके व आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
गोकुळच्या राजकारणात ३० वर्षांनंतर ‘मुनपा’ जुन्या ‘मनपा’ला आव्हान देण्याच्या स्थितीत आहे. अशा स्थितीत पी. एन. व सतेज हे गोकुळमध्ये एकमेकांच्या विरोधात ठाकले, तर त्यातून काँग्रेसमध्येही दुफळी माजणार आहे. पी. एन. हे सतेज पाटील यांच्या आघाडीसोबत आले, तर नरके व त्यांची मोट कशी बांधणार ? हा कळीचा मुद्दा राहणारच आहे.