लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: ऑनलाईन शाळा सुरू होऊन महिना होत आला तरी अजूनही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे हातात पुस्तक नसताना समोरून ऑनलाईन शिक्षक जे शिकवतील त्यावरच विद्यार्थ्यांना विषय समजून घ्यावा लागत आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीच्या वतीने पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. परंतु अजून ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीत. याआधी किमान पुस्तके हातात आल्यानंतर विद्यार्थी ते पुस्तके चाळत असत. एखादा धडा शिकण्याआधी त्यावर नजर फिरवली जात असे. किमान पुस्तकात काय आहे हे तरी पाहिले जात असे; परंतु पुस्तकेच मिळालेली नसल्याने सगळा आनंदी आनंद आहे.
चौकट
पुस्तकांसाठी पात्र तालुकावार विद्यार्थी
आजरा १०,०८०
भुदरगड १४७५४
चंदगड १७७९४
गगनबावडा ४४५६
गडहिंग्लज २०५८९
हातकणंगले ७७७८६
करवीर ४२७०९
कागल २९००५
पन्हाळा २६४८३
राधानगरी २०४८३
शाहूवाडी १८४३१
शिरोळ ३६६७८
एकूण ३,२१,३४८
चौकट
५ टक्के विद्यार्थ्यांनीच केली पुस्तके परत
विद्यार्थ्यांना दिलेली पुस्तके त्यांनी ते शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाळेत जमा करावीत अशी योजना आहे. ती पुन्हा अन्य विद्यार्थ्यांना परत दिली जातात; परंतु कोरोनामुळे शाळा बंद असल्याने केवळ ५ टक्केच विद्यार्थ्यांनी ही पुस्तके परत केली आहेत.
प्रतिक्रिया
मला दरवर्षी नवीन पुस्तक मिळाल्यानंतर त्यातील चित्रे बघायची सवय आहे. त्या चित्रावरून धडा कशाबद्दल आहे याची माहिती मिळते; परंतु यावेळी पुस्तकेच न मिळाल्याने चित्रेही पाहता येत नाहीत आणि अभ्यासही करता येत नाही.
स्नेहल लोढे, इयत्ता सहावी
प्रतिक्रिया
दरवर्षी मला पुस्तके मिळत होती. तेव्हा ती वाचताना मला आनंद मिळत होता; परंतु यावर्षी पुस्तके मिळालेली नसल्यामुळे चुकल्यासारखे वाटत आहे.
गणेश खाडे, चौथी
कोट
पुस्तके छापून तयार आहेत; मात्र ती वाहतूक करून प्रत्येक जिल्ह्याला किंवा तालुक्याला पोहोचवण्यासाठीची यंत्रणा नव्हती. आता राज्यस्तरावरून वाहतूक ठेकेदार निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच पुस्तके पोहोच केली जाणार आहेत.
आशा उबाळे
प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर