संदीप आडनाईककोल्हापूर : श्रीलंका, बांगलादेश आणि भारताच्या पश्चिम भागात दिसणारा दुर्मीळ इंडियन पेंटेड फ्रॉग (युपेरोडॉन टॅप्रोबॅनिकस) प्राणीशास्त्र संशोधकांच्या टीमने सांगली शहरातील आमराई परिसरातून शोधून काढला आहे. या भागात हा बेडूक पहिल्यांदाच दिसला. राज्यातील ही तिसरी नोंद आहे.सातारा जिल्ह्यातील मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. ओंकार यादव, कऱ्हाडमधील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे डॉ.अमृत भोसले, तासगावमधील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी चैताली गवळी आणि जतमधील राजे रामराव कॉलेजचे डॉ. प्रकाश सज्जन यांच्या पथकाला ही नोंद करण्यात यश आले आहे.कन्सास विद्यापीठाच्या रेप्टाइल्स अँड अँफिबियन्स ह्या नियतकालिकामध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. या बेडकाची ओळख कोल्हापूरचे शास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांनी पटवली आहे.चैताली गवळी या संशोधक विद्यार्थिनीने सांगलीतील आमराईमध्ये हा दुर्मीळ बेडूक पाहिला होता. ‘बेडूक पाहणे लक्षणीय होते कारण तो त्याच्या मॅपिंग क्षेत्राबाहेर दिसला, अशी प्रतिक्रिया तिने दिली.डॉ.ओंकार यादव म्हणाले, हे बेडूक जंगले, दाट झाडी, रस्त्याच्या कडेला असलेली ओलसर जमीन असा विविध अधिवास व्यापतात. भिंतीवरील खड्डे आणि झाडाची छिद्रे अशा ठिकाणी ते आश्रय घेतात.
राज्यातील तिसरी नोंदमहाराष्ट्र राज्यातील ह्या बेडकाची ही तिसरी नोंद आहे. याआधी हा बेडूक अर्नाळा बंदर, विरार आणि तीन वर्षांपूर्वी विदर्भातील जंगलात आढळला होता.
पर्यावरणातील बदल, वाढते तापमान आणि नष्ट होणारा अधिवास यामुळे उभयचर प्राण्यांना धोका वाढत असून जगभरातील बेडकांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. बेडूक हा पर्यावरण परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक असल्याने त्यांचे संवर्धन करणे मानवाच्या दृष्टीने गरजेचे आहे. -डॉ. ओंकार यादव, प्राणीशास्त्र विभागप्रमुख, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा, जि. सातारा.