कोल्हापूर : सातारा ते कागलपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाबाबत गुरुवारी दिल्लीत केंद्र सरकारचे रस्ते विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामध्ये करार झाला. त्यानुसार या १३३ किलोमीटरच्या अंतराचे सहापदरी रस्त्याचे अंदाजपत्रक करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पुणे-बंगलोर महामार्गावरील पुणे ते सातारापर्यंतच्या टप्प्याचे सहापदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. कोगनोळीपासून कर्नाटक हद्दीतील सहापदरीकरण यापूर्वीच म्हणजे चौपदरीकरणावेळीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे सातारा ते कागल या रस्त्याचे सहापदरीकरण कधी पूर्ण होणार याबद्दल लोकांत उत्सुकता आहे. कारण हा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचा वापरच करता येणार नाही. या रस्त्याची मालकी नॅशनल हायवे अॅथारिटीकडे (राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण) आहे. तो चारपदरी करण्याचे काम ठेकेदार म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. या रस्त्याचा विकास करताना त्यासाठी त्याचे मालक असलेल्या नॅशनल हायवे अॅथारिटीची परवानगी घ्यावी लागते त्या परवानगीचा भाग म्हणून हा करार झाला. सातारा ते कागल या रस्त्याच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. फिजिबिलीटीशी संबंधित अन्य अनुषंगिक मंजुरीची प्रक्रिया रखडली आहे. निविदा मागवल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिक कंपनीची काम करण्याची क्षमता व आर्थिक क्षमता तपासली जाते. ही प्रक्रिया ‘एनएचआय’च्या दिल्ली कार्यालयाकडून होते. त्यामुळे निविदा मागवून ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा-सात महिने लागू शकतात. या रस्त्यासाठी जमिनीचे संपादन यापूर्वीच झाले आहे. त्यामुळे कामामध्ये अन्य कोणताच अडथळा नाही. बसमार्ग, पार्किंग व अन्य अॅमनेटिजसाठीच नव्याने जमीन संपादन करावी लागेल.दोन महिन्यांत निविदा--सातारा-कागल सहापदरी रस्त्यासाठी येत्या दोन महिन्यांत स्वतंत्र वित्तीय संस्थेकडून या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून घेण्यात येईल व त्यानंतर रीतसर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.दृष्टिक्षेपात रस्ते प्रकल्प..सातारा ते कागल हा टप्पा १३३ किलोमीटरचा असून, रस्त्याचा खर्च २०१२ च्या अंदाजपत्रकानुसार १२९८ कोटी रुपये येणार आहे. पुणे ते सातारा हा टप्पा १४० किलोमीटरचा असून, त्याचा खर्च सुमारे १४०० कोटी रुपयांपर्यंत आहे. हे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतर्फे सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुमाचे सपाटीकरण, आवश्यक तिथे वृक्षतोड, मोऱ्या व पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. दर्जाबाबत प्रश्नचिन्ह...सातारा-कागल या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम राज्य रस्ते महामंडळाने केले आहे. त्याच्या दर्जाबद्दल सुरुवातीपासूनच प्रचंड तक्रारी आहेत. कर्नाटकातील रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून महाराष्ट्राच्या तुलनेत तिथे टोलचे दरही कमी आहेत. त्यामुळे आता नव्याने रस्त्याचे काम होताना दर्जा आणि टोलचे दर या मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
सातारा-कागल सहापदरी रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करणार : चंद्रकांतदादा
By admin | Published: November 05, 2015 11:30 PM