सतीश पाटीलकोल्हापूर : सहा पदरीकरणामध्ये शिरोली येथील सांगली फाटा ते उचगावदरम्यान सुमारे तीन किलोमीटरपर्यंतचा आणि कागल येथील बसस्थानकासमोरून एक किलोमीटरचा पिलरचा उड्डाणपूल उभा करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या आढावा बैठकीत तत्वतः मान्यता दिली आहे. या दोन्ही उड्डाणपुलासाठी अंदाजे ६५० कोटींचा वाढीव निधी लागणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल या १३३ किलोमीटर अंतरातील सहा पदरीकरणाचे काम करताना शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज या तीन किलोमीटर अंतरावर पावसाळ्यात महामार्गावर २०१९ मध्ये आठ दिवस, तर २०२१ मध्ये चार दिवस पाणी येऊन महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. सध्या महामार्गाचे काम करताना या भागात ११ मोहऱ्या (छोटे बोगदे) पाणी जाण्यासाठी मंजूर केल्या होत्या. यामुळे १० फुटाने महामार्गाची उंची वाढणार होती. भविष्यात पंचगंगा नदीवर बंधारा तयार होऊन पाण्याची फुग वाढून नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा धोका होता. तसेच शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार होते. म्हणून सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीजपर्यंत पिलर उड्डाणपूल होणे गरजेचे होते.रस्ते कामांबाबत केंद्रीय मंत्री गडकरी आणि रस्ते अधिकारी, ठेकेदार यांची १० जुलै रोजी दिल्लीत बैठक पार पडली. यात सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज या तीन किलोमीटर अंतरावर आणि कागल येथील एक किलोमीटरचा पिलर उड्डाणपुलाबाबत चर्चा झाली. मंत्री गडकरी यांनी या दोन्ही उड्डाण पुलाचा नवीन प्रस्ताव तयार करा आणि नवीन स्वतंत्र निविदा काढण्यास सांगून या पिलरच्या उड्डाणपुलाला ग्रीन सिग्नल दिला.सात ठिकाणी नवीन भुयारी मार्गकागल ते सातारा सहा पदरीकरणात गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगरायचीवाडी, किणी आणि गणेगाव या सात ठिकाणी नवीन भुयारी मार्ग होणार आहेत. यासाठी वाढीव ६६ कोटींचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग अधिकाऱ्यांनी दिली.
शिरोली सांगली फाटा ते उचगावदरम्यान तीन किलोमीटरपर्यंतचा पिलरचा उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. याला तत्वतः मान्यता मिळाली आहे. पुलासाठी ४८० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. महामार्ग बंद पडू नये आणि कोल्हापूरकरांना महापुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी उड्डाणपूल गरजेचा होता. -खासदार धनंजय महाडिककागल येथे एक किलोमीटर पिलरचा उड्डाणपूल करणे गरजेचे आहे. नितीन गडकरी यांच्यासोबत चार दिवसांपूर्वी फोन करून चर्चा केली होती. कागल शहराचा हा मोठा जिव्हाळ्याचा विषय होता. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. -हसन मुश्रीफ, पालकमंत्री