सातारा : साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर शाहूपुरी गाव वसलेले; पण शाहूपुरी ग्रामस्थांचा वनवास काही संपेना. शाहूपुरी जाण्याच्या मार्गावर पुलाचे काम सुरू असल्याने द्रविडी प्राणायम करत लांबून वळसा घालावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी वादळात विद्युत तारा तुटल्याने चोवीस तास वीज गायब झाली होती. नागरिकांनी कितीही तक्रारी केल्या तरी त्या सोडविण्याचे गांभीर्य कोणी घेत नाही.सातारा शहरापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर शाहूपुरी गाव वसलेले. गावातील गोंगाटापासून दूर राहण्यासाठी अनेक नोकरदारांनी येथे जागा घेतलेल्या. शहराची रचनाही आखीव रेखीव आहे. एलआयसी, शिक्षक कॉलनी वसलेल्या आहेत. त्यामुळे वरवर पाहिले तर गाव खरोखरच आदर्श आहे, असे वाटते; पण तेथील रहिवाशांची दुखणे वेगळेच आहे.शाहूपुरीतून गेलेल्या वीज वाहक तारांना अनेक महिन्यांपासून झाडाची फांदी घासत होती. याबाबत संबंधित परिसरातील नागरिकांनी वारंवार वीज वितरण कंपनीला कळविले होते; पण त्यांनी आजचे काम उद्यावर ढकलण्याचे धोरण अवलंबले.साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. वाऱ्यांमुळे तेथील वीज वाहक तारा तुटल्या. त्यामुळे शाहूपुरीतील समता पार्क, संभाजी कॉलनी, दत्त दिगंबर कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
तब्बल चोवीस तासांनंतर तेथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक अगोदरच त्रासलेले आहेत. त्यातच पाऊस झाल्याने तापलेली जमीन उष्णता फेकत होती. उकाड्यामुळे त्रासलेल्या अनेकांना रात्र घराबाहेर बसून काढावी लागली. दुसऱ्या दिवशी दवाखाने, एटीएम सुविधांवर याचा परिणाम झाला.