चंद्रकांतदादा पाटील : संख्याबळ ४२च्या खाली येणार नाहीकोल्हापूर : सतेज पाटील यांनी कितीही फडफड केली तरी जिल्हा परिषदेत भाजप आणि मित्रपक्ष ४२ सदस्यसंख्येच्या खाली येणार नाहीत, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला आहे. सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे. त्यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे ते म्हणाले. रविवारी सायंकाळी येथील एका हॉटेलवर भाजप, जनसुराज्य आणि ताराराणी आघाडीच्या सदस्यांच्या बैठकीवेळी ते बोलत होते. २१ मार्चला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड असून, या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, के. एस. चौगुले यांच्या रूपाने भाजपचा एक जिल्हा परिषद सदस्य होता. आता ती संख्या १४ वर गेली आहे. शिवसेना नैसर्गिक मित्र आहे. त्यांच्याशी चर्चाही झाली आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत आणि पुनर्वसन ही खाती माझ्याकडे आहेत. त्यामुळे निधीची काळजी करू नका, परंतु भाजपमध्ये अविश्वास आणि भ्रष्टाचाराला स्थान नाही. अगदी अडचण असली तर खासगीत आमच्याशी बोला. मार्ग काढू. मात्र, कारभार चांगला झाला पाहिजे. जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष विनय कोरे म्हणाले, चंद्रकांतदादांनी जिल्ह्यात चांगली मोट बांधली. राज्यातही त्यांनी आम्हाला सहावा पक्ष म्हणून सहभागी करून घेतले आहे. मुंबईत पहारेकरी म्हणून काम करण्याच्या भूमिकेतही त्यांचा वाटा आहे. मात्र, तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेल्याने हा विजय मिळाला आहे. काही ठिकाणी भूमिका पोहोचविण्यास उशीर झाला. त्यामुळे काही ठिकाणी पराभव झाला. आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, जिल्हा परिषदेत सत्ता आल्यानंतर आपण २८ जणांना पदे देऊ शकतो. जिल्हा नियोजन मंडळावरही संधी दिली जाणार आहे. त्यामुळे ठामपणे सर्वांनी एकत्र राहावे. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्रातील यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांना उत्तम साथ देणारे चंद्रकांतदादा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, आमदार अमल महाडिक, संघटनमंत्री बाबा देसाई, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक, डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, गोपाळराव पाटील, पक्षप्रतोद विजय भोजे, जनसुराज्य समित कदम उपस्थित होते.
सतेज यांनी कितीही फडफड केली तरी सत्ता भाजपचीच!
By admin | Published: March 14, 2017 12:36 AM