कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांचे दुखणे मुरलेले असून, जखम अजून खोल आहे; त्यामुळे एका ड्रेसिंगमध्ये ती भरून येणार नाही पण ही जखम वेळेत दुरुस्त होईल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.आघाडी एकसंधपणे सामोरे जाणार असून कोल्हापूर जिल्ह्यामधील आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक, राजू शेट्टी व सांगलीतील ‘स्वाभिमानी’ देईल तो उमेदवार ताकदीने निवडून आणण्यासाठी कॉँग्रेस कार्यकर्ते प्रयत्न करतील, अशी ग्वाही आवाडे यांनी दिली. यावर कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे विरोधकांच्या प्रचारात सक्रिय आहेत; मग एकसंधपणे कसे सामोरे जाणार? अशी विचारणा पत्रकारांनी त्यांना केली. आवाडे म्हणाले, ‘सतेज यांचे दुखणे मुरलेले आहे. त्यांची जखम किती खोल आहे, हे जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे एका ड्रेसिंगमध्ये ही जखम भरणार नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेल. जखम वेळोवेळी दुरुस्त होईल; पण पुढील आश्वासने सगळ्यांनी पाळण्याचा विश्वास द्यावा लागेल. त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्त्यांत नाराजी आहे.’यावेळी युवक काँग्रेसचे रवि मोरे, सिध्दूजी माने उपस्थित होते.
सतेज यांच्या जे मनात, तीच त्यांना वाढदिवसाची भेटआमदार सतेज पाटील यांच्या जे मनात आहे तेच घडवून त्यांना वाढदिवसाची ‘गिफ्ट’ देण्याचा निर्धार पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पाटील यांचा १२ एप्रिल रोजी वाढदिवस असून, त्याच्या नियोजनासाठी ड्रीम वर्ल्ड येथे बैठकीचे शुक्रवारी आयोेजन केले होते.सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्याविरुद्ध उघड भूमिका घेत गेले महिनाभर जिल्हाभर वातावरण तयार केले आहे. मात्र, पक्षीय बंधनांमुळे त्यांना आता उघडपणे महाडिक यांच्याविरोधी प्रचार करणे शक्य नाही.
या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांचीही बैठक घेण्यात आली. वाढदिवसाबरोबरच सध्या राजकीय प्रचार कसा चालला आहे, याचीही चर्चा यावेळी रंगली. यावेळी पाटील यांच्या वाढदिवसाचे फलक न उभारता त्यांच्या मनामध्ये जे आहे ते घडवून दाखविणे हीच त्यांना वाढदिवसाची ‘गिफ्ट’ ठरणार असल्याने आपापल्यााागात याच कामात प्रामाणिकपणे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी सभापती शारंगधर देशमुख, राजू लाटकर, प्रदीप पाटील-भुयेकर, विजयसिंह मोरे, श्रीपती पाटील- बिद्री, कर्ण गायकवाड, धनराज घाटगे, सचिन घोरपडे, सदाशिव चरापले, शशिकांत खोत, बाबासाहेब चौगुले, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.