भादोले: विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यावेळी माझ्या घरात मी, चंद्रकांत पाटील, संजय पाटील आणि सतेज पाटील यांची बैठक झाली. त्या बैठकीत संजय पाटील आणि बंटी पाटील यांनीही निवडणूक बिनविरोध झाल्यास आम्ही राजाराम कारखाना बिनविरोध करू, असा ‘शब्द’ मला दिला होता. त्यानुसार मी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांना विनंती केली आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देत विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध केली. राजाराम कारखाना सभासद अपात्रता प्रकरणात वेळी मी त्यांना त्यांनी दिलेल्या ‘शब्दा’ची आठवण करून दिली होती. पण दुर्दैवाने बंटी पाटलांची ‘शब्द’ फिरवून सभासदांवर निवडणूक लादली आहे. पण मी महाडिकांना दिलेला ‘शब्द’ पाळणार आहे, असे विनय कोरे यांनी कुंभोज येथे सांगितले. यावेळी त्यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला. खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांनी लादलेली ही निवडणूक आम्ही बहुमताने जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. केवळ विरोधाला विरोध करण्याचे राजकारण करणाऱ्यांनी आता पराभवाची तयारी ठेवावी, असा टोलाही लगावला. यावेळी कुंभोजच्या सरपंच जयश्री जाधव,माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित कदम, बाबासाहेब पाटील, अरुण पाटील, शंकरराव पाटील, उत्तम पाटील, शिवाजीराव पाटील, अशोकराव माने ,दिलीप पाटील, सुरेश पाटील, भास्कर शेटे, राजकुमार भोसले,अनिकेत चौगुले यांच्यासह विविध मान्यवर, राजाराम कारखान्याचे सभासद, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमतची बातमी योग्यबिंदू चौकात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रकारासंदर्भात लोकमत मधून आलेल्या बातमीचा उल्लेख करुन खासदार महाडिक म्हणाले, इर्षा विकासासाठी असावी हे बरोबर आहे पण पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या बंटी पाटील यांनी कोल्हापूरात साधे संडास देखील बांधले नाही. परंतू मी केलेल्या बास्केट ब्रिजला हिणवले गेले.हीच घाणेरडी प्रवृत्ती सहकार नासवत असून याला वेळीच जागा दाखवणे गरजेचे आहे.