कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपद सतेज पाटील यांच्याकडे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 03:34 PM2019-09-05T15:34:35+5:302019-09-05T15:36:49+5:30
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे
तूर्त काही दिवसांसाठी सुरेश कुराडे किंवा गुलाबराव घोरपडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली जावी, असाही प्रवाह आहे. प्रदेश काँग्रेसकडून त्यासंबंधीची विचारणा कुराडे यांना झाली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने कायमस्वरूपी जिल्हाध्यक्षपद नेमण्याचा निर्णयच होण्याची शक्यता जास्त आहे.
पी. एन. पाटील यांच्यानंतर बराच प्रतिष्ठेचा मुद्दा करून ही जबाबदारी आवाडे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी फक्त सात महिनेच या पदावर काम केले. साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षाने महिन्यात राजीनामा दिला व भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला आवाडे यांच्या राजीनाम्याचा हादरा बसला आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर आता ही जबाबदारी कुणाकडे द्यायची, यासंबंधी प्रदेश काँग्रेसच्या पातळीवर विचार सुुरू झाला आहे.
पी. एन. पाटील हे सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीला वेळ द्यायचा असल्याने त्यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपद घेण्याची तयारी नाही. त्यामुळे आता या पदासाठी सतेज पाटील यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय काँग्रेसकडे नाही.
आमदार पाटील हे तरुण आहेत. त्यांच्याकडे स्वत:ची भक्कम यंत्रणा आहे. निवडणुकीत उमेदवारांना ते चांगली ताकद देऊ शकतात. शिवाय ते विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याने या कामासाठी वेळही देऊ शकतात. या सर्वांचा विचार होऊन त्यांच्याकडेच ही जबाबदारी येण्याची शक्यता गडद आहे. कुराडे गेली अनेक वर्षे पक्षात विविध पदांवर काम करीत असून संघटनात्मक कामाचा त्यांना अनुभव आहे.