Kolhapur: ‘करवीर’मध्ये ‘नपापा’; ‘सतेज-राहुल-चेतन’ यांची आघाडी; ‘गोकुळ’सह सर्व निवडणुका काँग्रेसच्या झेंड्याखाली
By राजाराम लोंढे | Published: September 9, 2024 05:42 PM2024-09-09T17:42:10+5:302024-09-09T17:42:59+5:30
राजाराम लोंढे कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके, आ. सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ...
राजाराम लोंढे
कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके, आ. सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची ‘नपापा’ आघाडी उदयास आली आहे. दोन दिवसांपूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली असून ‘गोकुळ’, जिल्हा बँकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेसच्या झेंड्याखाली सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल पाटील यांचे विधानसभेचे गणित सोपे करण्यासाठी सतेज पाटील यांनी यशस्वी खेळी खेळली आहे.
जिल्ह्यात १९९० च्या दशकात ‘मनपा’ (महादेवराव महाडिक, अरुण नरके व पी. एन. पाटील) आघाडीने राजकारणात दबदबा निर्माण केला होता. या आघाडीची ‘सांगरूळ’, ‘करवीर’, ‘पन्हाळा-बावडा’ विधानसभा मतदारसंघावर पकड होती. जवळपास पंधरा-वीस वर्षे ‘मनपा’ आघाडीची राजकारणावर पकड होती. आता महादेवराव महाडिक व अरुण नरके सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नव्याने ‘नपापा’ आघाडी उदयास आली आहे.
या आघाडीचा परिणाम ‘करवीर’, ‘शाहूवाडी’, ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघावर होणार आहे. आ. दिवंगत पी. एन. पाटील यांच्या पश्चात राहुल पाटील करवीरकरांना सामोरे जात आहेत. त्यांच्या समोर चंद्रदीप नरके यांच्या सारखा तगडा पहिलवान आहे. ते २५ वर्षे सक्रिय राजकारणात आहेत, त्यातील दहा वर्षे ‘करवीर’चे प्रतिनिधित्व केले. विरोधकांचे कमकुवत दुवे त्यांना माहीती आहेत. त्यामुळे त्यांनी बेरजेचे राजकारण सुरू केल्याने येथे काटा लढत होणार, हे निश्चित आहे.
‘राहुल’ यांचे विधानसभेचे गणित सोडवायचे झाल्यास पन्हाळा महत्त्वाचा असल्याचे सतेज पाटील यांना चांगलेच माहीती आहे. जुना करवीर व गगनबावड्यात सतेज पाटील, जुन्या सांगरूळमध्ये राहुल पाटील, तर पन्हाळ्यातून चेतन नरके यांची ताकद आहे. त्यामुळे हे नवे समीकरण राहुल पाटील यांना बळ देणारे ठरू शकते. पाच वर्षे आपल्यासोबत घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. नरके यांना पुढे करण्याची खेळीही सतेज पाटील यांची असू शकते.
‘कुंभी-कासारी’च्या राजकारणावर परिणाम
कुंभी कासारी साखर कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी काँग्रेसने अनेक वेळा निकराचे प्रयत्न केले, पण यश आले नाही. सतेज पाटील, राहुल पाटील व चेतन नरके एकत्र राहिले तर ‘कुंभी’ची निवडणूकही चढ जाऊ शकते.
‘गोकुळ’साठी अरुण नरकेंचा चेहरा उपयुक्त
‘गोकुळ’मधील अरुण नरके यांचे योगदान सामान्य दूध उत्पादकांना माहिती आहे. त्यामुळे संघाच्या आगामी निवडणुकीत अरुण नरके यांचा चेहरा सतेज पाटील यांना उपयुक्त ठरू शकतो. ही खेळीही या राजकारणामागील आहे.