सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड घट्ट

By राजाराम लोंढे | Published: November 20, 2023 12:42 PM2023-11-20T12:42:14+5:302023-11-20T12:43:01+5:30

‘गोकुळ,’ जिल्हा बँकेपाठोपाठ ‘बिद्री’ची धुरा : जिल्हा नेतृत्वाची पोकळी भरून काढणार

Satej Patil grip on the politics of Kolhapur district is tight | सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड घट्ट

सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड घट्ट

राजाराम लोंढे

कोल्हापूर : काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे; किंबहुना गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक तालुक्यात लक्ष देत कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. त्यामुळेच ‘गोकुळ,’ जिल्हा बँकेपाठोपाठ ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांच्या भूमिकेला महत्त्व राहिले आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीत पाच जागा तर घेतल्याच; त्याचबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीची धुराच देऊन त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीवर शिक्कामोर्तबही केले.

अलीकडील दहा-पंधरा वर्षांत येथील लोकप्रतिनिधींचे ‘मी आणि माझा मतदारसंघ’ असेच काहीसे समीकरण झाले आहे. दुसऱ्या तालुक्यात लक्ष दिले तर आपल्या अडचणी वाढतील, या भीतीपोटी प्रत्येकाने आपले गड शाबूत राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच जिल्ह्याचे नेते म्हणून स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार, बाळासाहेब माने, उदयसिंगराव गायकवाड, सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार महादेवराव महाडिक एवढीच नावे घ्यावी लागतात.

या नेत्यांनी प्रत्येक तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात ताकद निर्माण केल्याने त्यांना वजा करून जिल्ह्याचे राजकारण कधी करताच आले नाही. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँंग्रेस सोडल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मोठी संधी आली होती. त्यांनी काहीसा प्रयत्न केला; पण जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या राजकारणासाठी त्यांनी ‘कागल’, ‘राधानगरी’, ‘चंदगड’ वगळता इतर तालुक्यांतील दुसऱ्या पक्षाचे नेते दुखावतील या भीतीपोटी त्यांनी तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही.

त्यामुळे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर जिल्हा नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी आमदार सतेज पाटील यांनी भरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात जून २०१९ पासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पडल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात संघटना बळकट करण्याचे धोरण स्वीकारले. त्याचे फलित म्हणून जिल्ह्यात काँग्रेसचे चार विधानसभेचे व दोन विधानपरिषदेचे आमदार निवडून आणत, नेतृत्वाची चुणूक हायकमांडला दाखवली.

‘गोकुळ’मध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन सत्तांतर घडवले. येथेही त्यांनी जागा वाटप करताना भविष्यातील राजकारणाचा विचार करून सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन भौगोलिक समतोल राखला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. ‘बिद्री’ कारखान्यात आतापर्यंत त्यांना एका जागेवर समाधान मानावे लागत होते. यावेळी पाच जागा घेऊन त्यांनी आपले निवडणूकीतील महत्व अधोरिखित केले.

कागल वगळता सर्व तालुक्यांत ताकद

आमदार सतेज पाटील यांनी अकरा तालुक्यांत आपली निर्णायक ताकद निर्माण केली आहे. ‘कागल’मध्ये तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकारी आहेत; पण तेथील गटातटांच्या राजकारणामुळे अजून त्यांनी हात घातलेला दिसत नाही.

तालुकानिहाय अशी आहे सतेज पाटील यांची ताकद..

  • कोल्हापूर शहर, करवीर, गगनबावडा : स्वत:चा गट
  • राधानगरी : ‘गोकुळ’चे संचालक राजेंद्र मोरे, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले
  • भुदरगड : माजी सभापती सत्यजित जाधव, मधुअप्पा देसाई, सचिन घोरपडे, जीवन पाटील, शामराव देसाई, आदी.
  • चंदगड : ‘दौलत’चे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील.
  • आजरा : ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, अभिषेक शिंपी.
  • शाहूवाडी : ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड.
  • पन्हाळा : ‘गोकुळ’चे संचालक अमरसिंह पाटील
  • हातकणंगले : शशांक बावचकर, शशिकांत खवरे, राहुल खंजिरे यांसह ‘राजाराम’ कारखान्याशी संबधित पदाधिकारी
  • शिरोळ : गणपतराव पाटील
  • गडहिंग्लज : विद्याधर गुरबे

Web Title: Satej Patil grip on the politics of Kolhapur district is tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.