कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामधील माजी मंत्री आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला गेला आहे. शुक्रवारी सकाळी माजी आमदार अमल महाडिक यांनी पाटील गटाला आज संध्याकाळी ७ वाजता बिंदू चौकात या असे आव्हान दिले. त्यास प्रत्युत्तर म्हणून पाटील गटाचे कार्यकर्ते बिंदू चौकात जाणार असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
सकाळी वडणगे (ता.करवीर) येथे सत्तारुढ महाडिक गटाचा प्रचार प्रारंभ झाला. त्यामध्ये अमल महाडिक यांनी तुम्ही कारखान्यांवर वाट्टेल तसे आरोप करता, हिंमत असेल तर केलेल्या आरोपांची कागदपत्रे घेवून बिंदू चौकात या..आम्हीही तुमच्या डी.वाय.पाटील कारखान्याची कागदपत्रे घेवून बिंदू चौकात येतो असे जाहीर आव्हान दिले. त्यानंतर त्यांच्या गटातर्फे सोशल मिडीयावर तशा पोस्टही व्हायरल झाल्या.
त्यास प्रत्यूत्तर म्हणून सतेज पाटील गटानेही चॅलेंज स्विकारले, आम्ही बिंदू चौकात येतोय असे सांगत कार्यकर्त्यांना अजिंक्यतारा या कार्यालयावर बोलवले आहे. अमल महाडिक यांंना प्रत्यूतर देण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील हे कार्यकर्त्यासह जाणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने बिंदू चौक भीम अनुयायांनी सकाळपासूनच फुलला आहे.
शहराच्या दोन भागांतून सायंकाळी भिमसैनिकांच्या भीमरायाला अभिवादन करण्यासाठी मिरवणूका येणार आहेत. असे असताना पाटील-महाडिक गटाचे कार्यकर्ते तिथे जमले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र्न निर्माण होवू शकतो. निवडणूक कारखान्याची आहे. त्याबध्दल आरोप-प्रत्यारोप जरुर करावेत परंतू असे रस्त्यावर उतरण्याची भाषा दोन्ही नेत्यांनी टाळण्याची गरज आहे.