कोल्हापूर : येथील विमानतळावर नाईट लॅडिंग मुडशिंगीच्या बाजूने करण्यात येणार असून त्यातील अडचणी दूर कराव्यात यासाठी ४८ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून दिला जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, मुडशिंगीकडून नाईट लॅडिंगसाठी काही टॉवर हलवणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ४८ लाख रूपये दिले जातील. विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. यासाठी गरज पडल्यास लोकप्रतिनधींची मदत घ्यावी. प्रत्यक्ष स्थळ पाहणीचा दौरा निश्चित करून विस्तारीकरणातील तक्रारींचे निरसन करता येईल. यासाठीचे नियोजन महसूल विभागाने करावे.
विमानतळ प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कमलकुमार कटारिया यांनी नाईट लॅडिंगसाठीचे अडचणी सांगितल्या. ते म्हणाले, कळंबा पावरग्रिड येथील टॉवर आणि अनेक ठिकाणचे उंच बांधकाम नाईट लॅडिंगसाठी अडथळा ठरतात. मुडशिंगीच्या बाजूने लॅडिंग करताना हाय व्होल्टेजचे टॉवर अडचणीचे ठरतात. प्रत्येक विमानतळाची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. मुंबई, पुणे येथे विमानतळ परिसर सपाट आहे. कोल्हापूरच्या विमानतळाच्या परिसरात टेकड्या आहेत. टेकडीवर हाय व्होल्टेजचे टॉवर आहेत. ते विमान लॅडिंग करताना अडथळा ठरतात.
चौकट
कळंबा पॉवर ग्रीडला भेट
पालकमंत्री पाटील, खासदार मंडलिक, आमदार पाटील यांनी कळंबा पॉवरग्रिडला भेट दिली. येथे पॉवर ग्रीडचे अधिकारी हिंमास रावत यांच्याशी चर्चा करून नाईट लॅडिंगसाठीचे अडचथळे दूर करण्यासंबंधी चर्चा केली. पण नाईट लॅडिंगसाठी अडथळा ठरत असलेल्या पॉवरग्रिडच्या टॉवरची उंची कमी करणे शक्य नाही, ते स्थलांतरही करता येत नसल्याचे रावत यांनी सांगितले. त्यानंतर गिरगावात जाऊन टॉवरची पाहणी करण्यात आली. पाहणीवेळी टॉवर कसा नाईट लॅडिंगसाठी अडथळा ठरतो हे विमानतळ प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कमलकुमार कटारिया यांनी पालकमंत्री पाटील यांच्या यांना सांगितले. बैठकीस प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत कसे अडथळे नाहीत..?
कोल्हापुरातील विमानतळावर नाईट लॅडिंगसाठी उंच इमारती आणि विद्युत टॉवरचे अडथळे असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या समितीने नोंदवले आहेत. असे अडथळे मुंबई, पुणे येथेही ेआहेत. तिथे कसे नाईट लॅडिंग होते, असा प्रश्न पालकमंत्री पाटील यांनी उपस्थित केला. विमानतळ प्रशासनाच्या समितीने
केवळ काही तरी अडथळे दाखवायचे म्हणून दाखवले आहेत, का अशीही विचारणा त्यांनी केली. अडथळ्यातून मार्ग काढून नाईट लॅडिंग सेवा सुरू झाली पाहिजे, यासाठी विमानतळ प्राधिकरणाने वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा, अशाही सूचना पाटील यांनी दिल्या.
फोटो : २८०५२०२१-कोल-विमानतळ या नावाने पाठवत आहे.