कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉलमध्ये झालेल्या भाजपा-ताराराणी आघाडी पक्ष कार्यकर्ता मेळावा व प्रवेश कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या खंद्या समर्थकांनी गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपा व ताराराणी आघाडी व एक अपक्ष असे ३४ नगरसेवक आहेत. उत्तरोत्तर ४१ या मॅजिक फिगरकडे जाऊन आम्ही सत्ताही काबीज करु, शेवटी ससा आणि कासव यांच्यामध्ये कासवच जिंकते हे लक्षात ठेवा, असा टोला यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.
ते म्हणाले, महापालिकेच्या ताराबाई पार्क व मध्यवर्ती कारागृह प्रभागात ओबीसी दाखले रद्द झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली आहे. त्यापैकी मध्यवर्ती कारागृह प्रभागाची सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे, त्यामुळे केवळ ताराबाई पार्क या प्रभागात पोटनिवडणूक होणार आहे, त्यात ताराराणी -भाजपाकडून रत्नेश शिराळकर हे निवडणूक लढवणार आहे. देशातील विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, उपराष्ट्रपती व राष्ट्रपती या निवडणूकाही एक हाती भाजपाने जिंकल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड महापालिकेतही आमचीच सत्ता आणू. योग्य वेळी पाने उलगडून प्रतिस्पर्धांना धक्का देऊ, असे सुतोवाच ही पाटील यांनी केले.२०१९ च्या महापालिका कोल्हापूर महानगर पालिका निवडणूकीत गड काबीज करण्यासाठी संघटनात्मक कार्य महत्वाचे आहे. त्यामुळे ताराबाई पार्क प्रभागातील पोटनिवडणूकीपासून ४८०० मतदार आहेत. त्यात पक्षाच्या ४०० कार्यकर्त्यांनी प्रत्येकी १० ते १२ जणांची भेट घेऊन तेथे पक्ष मजबूत करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. ताराराणी आघाडीतर्फे सर्वेसर्वा स्वरुप महाडीक यांनी ताराबाई पार्कमधून रत्नेश शिराळकर यांची उमेदवारी जाहीर केली. स्वागत भाजपा महानगर महासचिव विजय जाधव यांनी स्वागत, तर प्रास्ताविक महानगर जिल्हाअध्यक्ष संदीप जाधव यांनी केले.आमदार अमल महाडीक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुहास लटोरे, अशोक देसाई, नगरसेवक सत्यजित कदम, सुनील कदम, विजय सुर्यवंशी, किरण शिराळे , अशिष ढवळे, माणिक पाटील चुयेकर, माजी नगरसेवक निलेश देसाई, आदी उपस्थित होते.
हा तर सुतळी बॉम्ब, मोठा बॉम्बस्फोट बाकी
या मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक माजी उपमहापौर मोहन गोंजारे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, सतीश लोळगे, राजर्षी शाहू गर्व्हंमेंट सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत घाटगे, प्रभावी कार्यकर्ते अमर साठे, संजय जाधव, प्रशांत करपे, सविता बोडके यांनी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीत प्रवेश केला. यावेळी आता केवळ सुतळी बॉम्बचा स्फोट झाला, यापुढे मोठा बॉम्बस्फोट होईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.
२५ घरांमध्ये एक समन्वयक
उत्तर व दक्षिण विधानसभा मतदार संघात एकूण ४ लाख ५० हजार इतके मतदान आहे. याकरीता ४५०० कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा. अशी सुचनाही पालकमत्री पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व जिल्हाअध्यक्ष संदीप देसाई यांना या मेळाव्यात केली. किमान २५ घरांमध्ये एक समन्वयक कार्यकर्ता पोहचेल याची काळजी घ्या. येत्या लोकसभेत किमान ४०० जागा पक्षाला मिळण्यास हरकत नाही असाही निर्वाळा पाटील यांनी दिला.जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरु नये
नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना प्रवेश देताना त्याच्या कार्याचा योग्य सन्मान केला जाईल. याचा अर्थ जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाणार नाही. अशी कुणीही भावना करुन घेऊ नये, असा सल्लाही पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.