भारत चव्हाणकोल्हापूर : राजकारणात कोणाला गृहीत धरून चालत नाही. मतदारांनाच काय तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनाही गृहीत धरून चालत नाही. जेथे ‘डॅमेज’ झाले असेल तेथे तत्काळ सुधारणा करावी लागते. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर करावी लागते. कार्यकर्त्यांना महत्त्व द्यावे लागते. परंतु ‘काँग्रेस’ पक्षाने याच चुका केल्या. त्याची जिल्ह्यात पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. आजच्या घडीला जिल्हा काँग्रेसमुक्त असला तरी तो संपला असे नाही. पक्षाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया नव्याने सुरू करावी लागणार आहे.
जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना पक्षाने राज्य पातळीवरील नेतृत्वाची जबाबदारी दिल्याने त्यांना विधानसभा निवडणूक काळात मुंबई, दिल्ली येथील बैठकीत सातत्याने भाग घ्यावा लागला. त्यांच्या नंतर दुसरे नेतृत्वच पक्षात नसल्याने पक्ष समन्वयाची प्रक्रिया ढिली पडली. काँग्रेस बेसावध राहिली. त्याचा परिणाम पाच जागा मिळूनदेखील एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. एकही आमदार निवडून आला नाही म्हणून जिल्हा काँग्रेसमुक्त झाला असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण २०१४ च्या निवडणुकीत आतासारखा एकही आमदार काँग्रेसचा झाला नाही, मात्र २०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक चार आमदार निवडून आले. काँग्रेस तळागाळात रुजली आहे. ती इतक्या सहजासहजी संपणार नाही.
महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा आणि राष्ट्रीय पक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही या पक्षाची ताकद मोठी आहे. सहकारी संस्था ताब्यात आहेत. या संस्थांवर संचालकही काँग्रेस विचाराचे आहेत. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हा जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले. त्यावेळी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात पुन्हा उभारणार नाही असे वाटत होते. परंतु उरलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड, कल्लाप्पाण्णा आवाडे, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेस नव्याने उभी केली.
अलीकडील काही वर्षांत विशेषत: पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसची जबाबदारी एकट्या आमदार सतेज पाटील यांच्यावर येऊन पडली आहे. त्यांच्या तोडीचा कोणीच नेता सध्या पक्षात दिसत नाही. त्यानेच पक्षाचे नुकसान होत आहे. त्यामुळे नेतृत्वाची नवी फळी निर्माण करणे काँग्रेससमोरील पहिले आव्हान आहे. त्यानंतर समाजसेवेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची कामे करणे हे दुसरे आव्हान आहे. अनेकदा आपण पाहतो की, काँग्रेस पक्षात कार्यकर्ते समाजकारणाला फारसे महत्त्व देत नाहीत. पण पुढील काळात टिकायचे असेल ते हे करावेच लागणार आहे.
सतेज पाटील यांचा कसोटीचा काळ सुरूजिल्ह्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्याची तयारी आतापासून करावी लागणार आहे. विधानसभेत झालेल्या दारुण पराभव जिव्हारी लावून न घेता नव्या उमेदीने कामाला लागण्याची काँग्रेसला जास्त आवश्यकता आहे. कारण ‘थांबला तो संपला’ असे म्हणतात. त्यामुळे थांबून चालणार नाही. अडचणी आल्यानंतरच कसोटीचा काळ सुरू होतो. सतेज पाटील यांचा कसोटीचा काळ सुरू झाला आहे. पक्षाला ते कशी उभारी देतात हे पाहावे लागेल.
उमेदवार - मते
- ऋतुराज पाटील - १,२९,६५६
- राहुल पाटील - १,३२,५५२
- राजेश लाटकर पुरस्कृत - ८१,५२२
- राजूबाबा आवळे - ८७,९४२
- गणपतराव पाटील - ९३, ८१४