- समीर देशपांडे कोल्हापूर : बरोबर पाच वर्षांपूर्वी याच मोसमामध्ये एका संध्याकाळी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या बंगल्याच्या मागच्या लॉनवर राष्ट्रवादीचे तत्कालिन मंत्री हसन मुश्रीफ हे धनंजय महाडिक यांना घेऊन पोहोचले. मतभेद असले तरी सतेज यांनी महाडिक यांना मदत करावी, असे आवाहन केले गेले. त्यानंतर सहाच महिन्यांनी सतेज पाटील यांचा पराभव करत अमल महाडिक आमदार झाले.ग्रामविकास आणि गृहराज्यमंत्रिपदावर प्रचंड काम करूनही झालेला हा पराभव पाटील यांनी फारच मनाला लावून घेतला. ‘मी प्रचंड कामे केली ही माझी चूक झाली का’ असा सवाल त्यांनी त्यावेळीही कार्यकर्त्यांना विचारला होता. तीच भळभळती जखम उरात घेऊन आज सतेज पाटील यांनी बंडाची भूमिका घेतली आहे. त्याच वेदनांनी त्यांना आता धनंजय महाडिक यांच्याविरोधात सक्रिय बनविले आहे.अशा परिस्थितीमध्ये जिल्'ातील काँग्रेस सध्या थंड आहे. अजूनही एकतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही आणि आघाडीचे उमेदवारही जाहीर झालेले नाहीत, असे कारण काँग्रेसकडून सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे ‘काँग्रेस थंड तर सतेज पाटील यांचे बंड’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभर आधी जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये बदल झाला. सतेज पाटील यांची ज्यांच्याशी जवळीक आहे, असे प्रकाश आवाडे जिल्हाध्यक्ष झाले. त्यामुळे त्याचे पडसाद जिल्'ात उमटायला सुरुवात झाली आहे. आजरा तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर हे ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांना मानणारे आणि आपटे हे महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांना मानणारे. त्यामुळेच नार्वेकर यांना बदलून त्या ठिकाणी आजरा साखर कारखान्याचे संचालक विष्णूपंत केसरकर यांची नियुक्ती केली जाणार आहे.
सतेज पाटील यांचे बंड, काँग्रेस मात्र अद्याप थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 6:54 AM