कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळ्याची थकबाकी असती तर विधान परिषदेच्या निवडणुकीत माझा अर्जच छाननीत बाद झाला असता. पण, हे राज्यात एकेकाळी पाच महत्त्वाची खाती सांभाळलेल्या व स्वत:ला दोन नंबरचे नेते म्हणवून घेणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना समजू नये यातून त्यांची राजकीय अपरिपक्वताच महाराष्ट्राला दिसून आल्याची टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.विधिमंडळात कोणत्याही आमदारांविरुद्ध काही आरोप करायचे असल्यास त्याची अगोदर नोटीस द्यावी लागते. परंतु शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता म्हणून त्यांनी माझे नाव घेतले नाही. परंतु सोशल मीडियावर माझ्या नावासह ही बातमी व्हायरल केल्याने त्यास उत्तर देत असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, चंद्रकांतदादांनी ३० कोटींचा घरफाळा थकीत असल्याचा आरोप केला आहे. तो धादांत खोटा आहे.डी.वाय. पाटील ग्रुपने ११ कोटी ५० लाख रुपयांचा घरफाळा भरला आहे. घरफाळ्याची कोणतीही थकबाकी नसल्याचे पत्रच महापालिकेने दिले आहे. हे पत्र मी चंद्रकात पाटील यांना व्हॉटसॲपवर पाठविणार आहे. ते १२ वर्षे विधान परिषदेचे आमदार होते, आताही ते आमदार आहेत. कोणीतरी त्यांच्या हातात कागद सरकवते व तो वाचून कोणतीही माहिती न घेता ते आरोप करतात. हे त्यांना शोभणारे नाही. महापालिकेला एक फोन करून ते त्याची चौकशी करू शकले असते.निवडणूक झाली की आरोप गायबकोल्हापुरातील कोणतीही निवडणूक आली की माझ्यावर तेच - तेच जुने बिनबुडाचे आरोप होतात. निवडणूक होते, मी विजयी होतो. मग, सगळेच आरोप नवीन निवडणूक येईपर्यंत शांत होतात. याचा अर्थ असे आरोप करून निव्वळ बदनामीचे षडयंत्र रचले जाते, अशी टीका पालकमंत्री पाटील यांनी केली.तुम्ही काय केले हे सांगा..थेट पाईपलाईनला मी मंजुरी आणली असली तरी तुम्ही ती पूर्णत्वास न्या व त्याचे श्रेय तुम्हांस घ्या, असे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वारंवार सांगितले. त्यासाठी त्यांची अनेकदा भेट घेतली. परंतु त्यांनी या योजनेला कोणतीही मदत केली नाही आणि तेच चंद्रकांतदादा आता योजना का पूर्ण झाली नाही, अशी विचारणा मला करीत आहेत. दादा, तुम्ही पाच वर्षे पालकमंत्री होता, त्या काळात कोल्हापूरसाठी काय केले, याचे उत्तर द्या. २०१९ च्या महापुरात आम्ही पुराच्या पाण्यात असताना आपण कोठे होता? गेल्या वर्षी महापूर आला तेव्हाही आपण कोठे होता? अशी विचारणा त्यांनी केली.
महापालिकेचे पत्र असे..कोल्हापूर महापालिकेचे करनिर्धारक व संग्राहक यांनी डी.वाय. पाटील ग्रुपच्या कार्यकारी संचालकांना १६ मार्च २०२२ ला दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे, सयाजी हॉटेल, डीवायपी सिटी मॉल, डीवायपी मेडिकल कॉलेज, इंजिनीअरिंग कॉलेज इमारत क्रमांक १ व २, गर्ल्स हॉस्टेल रमणमळा, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, डीवायपी हॉस्पिटल कदमवाडी, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अजिंक्यतारा) या नऊ मालमत्तांची सन २०२१-२२ अखेरच्या घरफाळ्याची कोणतेही थकबाकी नाही.