कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या नोटिफिकेशनवर केलेले वक्तव्य बालिशपणाचे आहे. त्यांची वक्तव्येही पोरकटपणाचीच आहेत, अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी केली. त्यांनी लोकांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करू नये, अशी त्यांना सूचना आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.प्रसिद्धी पत्रकात मुश्रीफ म्हणतात, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या नोटिफिकेशनच्या सर्व प्रती माजी आमदार संजय घाटगे यांनी पत्रकारांना दिल्या आहेत. त्या नोटिफिकेशनच्या सर्वच प्रती मी आमदार पाटील यांना पाठवून दिल्या आहेत. सतेज पाटील यांना आमदार आणि मंत्री म्हणून अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी त्याची शहानिशा करावी. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन प्रक्रियेचा तारखांसह तपशीलही त्यांना देऊ शकतो, त्याचाही त्यांनी बारकाईने अभ्यास करावा.१५ ऑक्टोबरचा निर्णय सांगायला २३ तारीख का लागली, यासह कोल्हापुरातून गोव्याला कसे जायचे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द करणे, ही आमची शेतकऱ्यांशी बांधिलकी आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग आणि रद्द केलेला आहे, यापुढे तो कधीही होऊ देणार नाही. इतर जिल्ह्यांत ज्यांना हा रस्ता नको असेल तिथले लोक तो विषय बघतील.त्यांना चिंता गोव्याला जाणाऱ्यांची..कोल्हापूर जिल्ह्यात आम्हाला हा रस्ता नको आहे, त्यामुळे कोल्हापूरता तो रद्द झाला. शेतकऱ्यांची फसवणूक केली हे वाक्य वापरण्यापूर्वी त्यांनी शंभरवेळा विचार करायला हवा. मुश्रीफ असे करू शकतात काय, याबाबतही विचार करायला हवा होता. कारण, आम्हाला शेतकऱ्यांची तर त्यांना गोव्याला जाणाऱ्यांची चिंता असल्याचा टोलाही मुश्रीफ लगावला.
सतेज यांचे ‘शक्तिपीठ’बद्दलचे वक्तव्य बालिशपणाचे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 12:36 PM