कोल्हापूर : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काल ‘आया-रामां’ना वगळून भाजपने जिंकून दाखवावे, असे पत्रक काढले होते, परंतु प्रत्येक मनुष्याने स्वत:चा भूतकाळ कधीही विसरू नये, कारण याच सतेज पाटील यांनी स्वत:च्या वाहनावर पाच पक्षांचे पाच झेंडे लावून आमदारकी मिळविली. सर्व रंगमंचावर फिरणाऱ्या त्यांच्यासारख्या नेत्याने आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये, असा टोला भाजपचे संघटन मंत्री बाबा देसाई यांनी मंगळवारी लगावला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या टीकेला त्यांनी पत्रकाद्वारे उत्तर दिले. या पत्रकात म्हटले आहे, ‘सतेज पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपचे तत्कालीन खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची प्रचारसभा सासने ग्राऊंडवर झाली, त्यावेळी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून स्वत:चा प्रचार करताना नीतिमत्ता कुठे गेली होती, हा प्रश्न स्वत:च्या मनालाच विचारावा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हजारो कोटींचा निधी आणला आहे. विकास हा केंद्रबिंदू मानून पालकमंत्री पाटील वेगाने काम करत आहेत. त्यामुळेच प्रभावित होऊन इतर पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये वषार्नुवर्षे कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी याही निवडणुकीत दिली जाणार आहे. भाजपचा विकासकामांचा धडाका पाहूनच सतेज पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे व ते बेताल वक्तव्य करत सुटले आहेत. ज्या सतेज पाटलांनी आय. आर. बी. कंपनीची टोलची पावती फाडण्याचा भीमपराक्रम केला. कोल्हापूर शहराच्या नागरिकांना शुद्ध पाणी देतो म्हणून थेट पाईपलाईन योजना आणली, परंतु आज पाईपलाईनच्या कामाची दुरवस्था काय आहे हे त्यांनी जाहीर करावे. त्यामुळेच त्यांनी प्रथम आत्मक्लेश करावा. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पराभवात त्यांचा सिंहाचा वाटा होता हे तमाम जनतेला माहीत आहे. ज्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गुरू मानून राजकारणाचा श्रीगणेशा केला, त्याच गुरूला जिल्ह्यातून हद्दपार करतो, असे म्हणणारे सतेज यांनी भाजपबद्दल वक्तव्य करू नये. (प्रतिनिधी)
सतेज यांनी भाजपला नीतिमत्ता शिकवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 11:15 PM