मंत्रिमंडळाच्या विस्तारात ‘सतेज’ हेच सरस, अडचणीच्या काळात दिलेल्या उभारीचे फळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:43 PM2019-12-31T12:43:23+5:302019-12-31T12:46:32+5:30
राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्यासाठी आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात चांगलीच रस्सीखेच होती. दोघांनीही आपापली राजकीय ताकद वापरून शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले; मात्र सतेज पाटीलच सरस ठरले. अडचणीच्या काळात त्यांनी काँग्रेसला दिलेल्या उभारीचे फळ पक्षाने दिले.
कोल्हापूर : राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्यासाठी आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात चांगलीच रस्सीखेच होती. दोघांनीही आपापली राजकीय ताकद वापरून शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले; मात्र सतेज पाटीलच सरस ठरले. अडचणीच्या काळात त्यांनी काँग्रेसला दिलेल्या उभारीचे फळ पक्षाने दिले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोल्हापूरला प्रतिनिधित्व मिळणार, हे निश्चित होते. जिल्ह्यात कॉँग्रेसचे चार आमदार आहेत; मात्र मंत्रिपदासाठी पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्यातच चुरस होती. पी. एन. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे यांच्या माध्यमातून सर्व ताकद पणाला लावली होती.
निष्ठावंत म्हणून त्यांची काँग्रेसमध्ये ओळख आहे. ज्येष्ठत्व आणि निष्ठा या बळावर संधी मिळेल, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. गेले पाच वर्षांत विशेषत: लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना शिवसेनेतून मोठी आॅफर होती; मात्र काँग्रेससोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
विधानसभेच्या तोंडावर प्रकाश आवाडे यांनी जिल्हाध्यक्ष पद सोडले. ही जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावर सोपविली. प्रदेशाध्यक्षांचा विश्वास सार्थ ठरवीत जिल्ह्यातील सहापैकी चार आमदार निवडून आणले. महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवल्याने त्यांना बळ देण्यासाठीच मंत्रिपदी वर्णी लागली.
‘कॅबिनेट’ची हुलकावणी
राज्यमंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले होते. त्यामुळे यावेळेला कॅबिनेटपदी बढती मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र विधानपरिषदचे सदस्य, आठ कॅबिनेट मंत्री पदांमुळे हुलकावणी मिळाल्याचे समजते.